धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वाद शिगेला पोहोचल्याने संतापलेल्या पतीने गॅसचा सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची निर्घुण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना पेण तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या चांदेपट्टी गावात घडली आहे.

गणपती उत्सवासाठी संजय तुकाराम दळवी व त्याची पत्नी सुवर्णा संजय दळवी (40) पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावी आले होते. या दांपत्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला. वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात पती संजय दळवी याने रागाच्या भरात गुरुवारी पत्नी सुवर्णाच्या डोक्यात सिलेंडर टाकुन तिची हत्या केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे.

या घटनेची माहिती मिळताच देवदूत कल्पेश ठाकूर आणि गावातील युवक महेश भिकावले हे रुग्णवाहिका घेवून घटना स्थळी पोहचले व सुवर्णा दळवी यांना उपचारार्थ पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

नेमक भांडणाच कारण स्पष्ट झालेलं नसून आरोपी संजय दळवी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तडवी, पोलीस काळे, पोलीस फड हे करीत आहेत.