क्रिकेटपेमींना रो-को फायनलची प्रतीक्षा, दिग्गजांच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्याची क्रिकेटवेडय़ांची इच्छा

गेल्या वर्षी टी-20 आणि आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले हिंदुस्थानी क्रिकेटचे आधारस्तंभ असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी सामना खेळत निवृत्त व्हायला हवे होते, अशी माफक अपेक्षा क्रिकेटप्रेमींची होती, मात्र दोघांनीही आश्चर्याचा जबर धक्का देत अचानक आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे रो (रोहित) आणि को (कोहली) यांच्यात आयपीएलच्या अठराव्या मोसमाचा अंतिम सामना रंगला जावा, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्यासाठी सारेच या क्षणाची आतुरतेने वाटही पाहात आहेत.

ज्या पद्धतीने रोहित आणि कोहलीने आपल्या आवडत्या कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला, त्यावरून हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये जे दिसतंय, ते नक्कीच नाही. त्यामुळे आता आयपीएल खेळत असलेले हे दिग्गज पुढच्या वर्षी आयपीएल खेळतीलच याचीही कुणी शाश्वती देऊ शकत नाही. त्यातच सध्या आयपीएल आपल्या शेवटच्या टप्प्यात असून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम फेरीत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. असे घडल्यास अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये प्रथमच रो-को फायनलचा थरार अनुभवता येईल. जो आजवरच कधीच घडलेला नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने चक्क पाचवेळा आयपीएलचा करंडक उंचावलाय, मात्र सलग 18 वर्षे एकाच संघाकडून खेळणाऱया विराट कोहलीला अद्याप एकदाही हे भाग्य लाभलेले नाही. त्यामुळे अवघ्या क्रिकेटप्रेमींची सहानुभूती विराटच्याच बाजूने आहे. 18वी आयपीएल ट्रॉफी त्यानेच जिंकावी अन् त्याने उंचवावी, अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे.

रो-को फायनल शक्य

रो-को फायनलच्या आधी प्ले ऑफमध्ये मुंबई आणि बंगळुरूला पहिले आणि दुसरे स्थान मिळवण्याची नामी संधी होती, मात्र पंजाबविरुद्ध झालेल्या दारुण पराभवामुळे मुंबईच्या चौथ्या स्थानावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता उद्या बंगळुरू आपल्या अखेरच्या साखळी लढतीत काय करतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या बंगळुरू जिंकल्यास ते थेट अव्वल स्थानावर पोहचतील. हरले तर रो-को फायनलचा विषय तेथेच संपेल. कारण बंगळुरू हरला तर एलिमिनिटरचा सामना या दोघांत होईल आणि दोघांपैकी एक संघ क्वालिफायर 2 साठी पात्र ठरेल. जरी अखेरच्या साखळी लढती जिंकण्यात मुंबई आणि बंगळुरूला अपयश आले तरी ते अंतिम फेरीत पोहोचावेत, अशीच सारे वाट पाहात आहेत. या दोन्ही दिग्गजांना अहमदाबादच्या स्टेडियममध्ये लाखोंच्या साक्षीने मानाचा मुजरा करण्याची हिंदुस्थानी क्रिकेटवेडय़ांची मनापासून इच्छा आहे. मुंबईला तर पंजाबने धक्का दिलाय. उद्या बंगळुरूबाबत नेमपं काय घडतेय, ते कळेलच.

प्रथमच मुंबई-बंगळुरू फायनल?

आयपीएलच्या इतिहासात आजवर कधीही मुंबई आणि बंगळुरू यांच्यात अंतिम सामना झालेला नाही. मुंबईने आजवर सहावेळा अंतिम सामन्यात धडक मारलीय आणि त्यात पाच वेळा ते विजेते ठरलेत. बंगळुरूनेही आतापर्यंत तीनवेळा अंतिम फेरीत स्थान मिळवलेय, मात्र एकदाही त्यांना करंडक जिंकता आलेलं नाही. 2016 साली ते शेवटच्या वेळी अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत ते चारवेळा प्ले ऑफमध्ये खेळले, पण अंतिम फेरीत स्थान मिळवू शकले नाहीत. त्यामुळे यावेळी ते आपल्या कामगिरीचा इतिहास-भूगोल सारं बदलतील आणि जेतेपदाचाही करिश्मा करून दाखवतील. अवघा हिंदुस्थान या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय.