राज्यसभेत हंगामा; प्रचंड गदारोळात कृषी विधेयक मंजूर, विरोधकांनी नियम पुस्तिका टरकावली

rajya sabha-farmer-bill

लोकसभेत मंजूर झालेली शेतकरी उत्पादन, व्यापार व वाणिज्य आणि शेतकरी (हक्क व सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयके केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रविवारी राज्यसभेत मांडली. तेव्हा सभागृहात जोरदार हंगामा झाला. सर्वच विरोधी खासदार कमालीचे आक्रमक झाले. त्यात आघाडीवर होते तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन. एकीकडे खासदारांनी  वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केलेली असतानाच डेरेक यांनी थेट उपसभापती हरिवंश यांचा माइक तोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय नियमावलीचे पुस्तकही त्यांनी टराटरा फाडले. हा गोंधळ एवढा वाढला की, अखेर मार्शलना बोलवावे लागले. दहा मिनिटांनंतर पुन्हा गोंधळ झाला. या गोंधळातच आवाजी मतदानाने सरकारने ही दोन्ही विधेयके मंजूर केली.

शेतकरी विधेयकावरून रविवारी राज्यसभेत जोरदार गदारोळ उडाला. गोंधळी खासदारांवर कारवाई करण्याचे संकेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहेत. त्याअनुषंगानेच नायडू यांच्या निवासस्थानी उपसभापती हरिवंश, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांची बैठकही झाली.

द्रमुकच्या अलेंगवन यांनी ही विधेयके देशाच्या जीडीपीमध्ये 20 टक्के योगदान देणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांना गुलाम बनवून टाकतील अशी टीका केली, तर काँग्रेसच्या प्रतापसिंग बाजवा यांनी या विधेयकांना मंजुरी देणे म्हणजे शेतकऱ्य़ाच्या अधोगतीवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे अशी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी कृषी क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा करायला हवी होती अशी अपेक्षा बोलून दाखवली.

दरम्यान, माकपा, तृणमूल आणि द्रमुकने या विधेयकांमध्ये संशोधन व्हावे. ती राज्यसभेच्या समितीकडे पाठवावीत, असा प्रस्ताव दिला आहे. डीएमके, सपा, राजद, अकाली दल या पक्षांनीही या विधेयकांना तीक्र विरोध केला आहे.

राज्यसभा टीव्हीच्या वायर्स कापल्या

तृणमूलचे डेरेक यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने राज्यसभा टीव्ही चॅनेलच्या वायर्स कापल्या. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे सांगून डेरेक म्हणाले की, सरकारने शेतकऱ्य़ांना धोका दिला आहे. संसदेतील प्रत्येक नियम त्यांनी तोडला म्हणून ती नियमावलीची पुस्तिकाच आम्ही फाडली.

हा काळा दिवस

कृषिमंत्री तोमर यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले असताना काँग्रेसने मात्र हा काळा दिवस असल्याची टीका केली आहे. बाहुबली मोदी सरकारने जबरदस्तीने ही दोन्ही विधेयके मंजूर केली आहेत. देशातील शेतकरी मोदी सरकारला कधीच माफ करणार नाहीत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे.

उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव

विरोधी पक्षांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. उपसभापती हरिवंश यांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करायला हवे होते. मात्र त्यांच्या भूमिकेमुळे लोकशाहीला धक्का लागला आहे. म्हणूनच आम्ही अविश्वास प्रस्ताव मांडल्याचे काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या