
कर्जाचा डोंगर वाढत असताना निसर्गाच्या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घासही गेला. अतिवृष्टीने दीड एकर शेती डोळ्यादेखत उद्ध्व्स्त झाल्याने कर्ज फेडायचे तरी कसे या चिंतेने एका शेतकरी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने वडवण तालुक्यामध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. योगेश खांडवे (25) असे त्याचे नाव आहे.
शेतीमध्ये खर्च जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे. दोन महिन्यापूर्वी अकरा हजार रूपये क्विंटल असणारे सोयाबीन जेव्हा शेतकरी बाजारात घेवून जातो तेव्हा त्याची किंमत पाच हजार क्विंटल होते. आधीच अतिवृष्टी, हातात काही राहिले नाही. शेतामध्ये जायचे काम राहिले नाही. काढलेले कर्ज फेडणार कसे या विवंचनेत असणाऱ्या केंडेपिंप्री येथील तरूण शेतकरी योगेश वसंत खांडवे (25) याने शुक्रवारी आत्महत्या केली.
दिड एकर शेती असणाऱ्या योगेश खांडवे यांनी बँक ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेकडून 70 हजार रूपये कर्ज उचलले आहे. शेतात पिक आल्यानंतर ते कर्ज फेडेन असा विचार असताना. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. अशापरिस्थितीत कर्ज फेडावे या चितेंने योगेश त्रासला होता. अखेर गळफास घेवून त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणे आणि एक भाऊ असा परिवार आहे.
























































