
लॉक डाऊनमधला मोकळा वेळ सत्कारणी लावत ओडिशातील एका शेतकऱयाने चक्क इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. सोलार पॉवर बॅटरीवर धावणारी ही कार सिंगल चार्ंजगमध्ये 300 कि.मी. अंतर कापू शकणार आहे. ओडिशातील मयूरभंज जिह्यातील सुशील अग्रवाल या शेतकऱयाने ही कमाल करून दाखवली आहे.
सुशील अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये 850 वॅटची मोटर आहे आणि ही कार चालण्यासाठी 100Ah/54 volts ची बॅटरी वापरली आहे. या कारची बॅटरी सौर ऊर्जेवर चार्ज होते. ही बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागतो. ही कार उशिरा चार्ज होत असली तरी याची बॅटरी लाईफ मात्र दहा वर्षांची आहे. त्यामुळेच ही कार इतर कारपेक्षा सरस असल्याचा दावा सुशील यांनी केला आहे.
पुस्तक, यूटय़ूबची घेतली मदत
लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेत सुशील यांनी दोन मेकॅनिक आणि एका मित्राच्या मदतीने ही कार तयार केली आहे. मोटार वाइंडिंग, इलेक्ट्रिक फिटिंग आणि चेसीसच्या कामासाठी या तिघांची मदत सुशील यांना झाली. लॉक डाऊनमध्ये मी घरीच रिकामा बसलो होतो. त्या वेळी मला इलेक्ट्रिक कारची कल्पना सुचली. कारण पेट्रोल, डिझेलच्या किमती लॉक डाऊननंतर भडकतील असा मला अंदाज होता. कार बनवण्यासाठी काही पुस्तकांची आणि यूटय़ूबच्या व्हिडीओचीदेखील मदत झाल्याचे शेतकऱयाने सांगितले.


























































