
मुळा भाजीला मातीमोल भाव मिळत असून, त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने देवळा तालुक्यातील सावकी येथील धनंजय बोरसे हवालदील झाले, त्यांनी अखेर आपल्या एक एकरावरील हे पीक रोटाव्हेटर फिरवून उद्ध्वस्त केले.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढल्याने हॉटेल व घरगुती जेवणात कांद्याऐवजी मुळ्याचा वापर वाढला होता, त्यामुळे मुळ्याची मोठ्या प्रमाणात मागणी होती. बहुतांश शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल, या आशेने मुळ्याची लागवड केली होती. मात्र, आता कांद्याचेच दर कमी झाल्याने मुळ्याला चार ते पाच रुपये प्रतीकिलो असा कवडीमोल भाव मिळत आहे. यातून लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्कील झाले असल्याने किमान शेतात खत होईल, या उद्देशाने धनंजय बोरसे यांनी या पिकावर रोटाव्हेटर फिरविला, अशीच परिस्थिती जिल्ह्यातील बहुतांश भाजीपाला उत्पादकांवर ओढावली आहे.

































































