
शेतात राखणीसाठी गेलेल्या एका 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी एका 32 वर्षांच्या तरुणाला अटक झाली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अटल असं या आरोपीचं नाव आहे. मोहरीच्या शेताची राखण करण्यासाठी पीडिता दररोज तिच्या आईसोबत जात असे. शुक्रवारीही ती राखणीसाठी निघाली. मात्र, यावेळी तिची आई तिच्या सोबत नव्हती. या मुलीवर पाळत ठेवून असलेल्या अटलने तिचं अपहरण केलं. तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह शेजारच्या शेतात फेकून दिला.
दुसरीकडे सकाळी राखणीला गेलेली पीडिता संध्याकाळी घरी आली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. सर्वत्र शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदन अहवाल आल्यानतंर आरोपीचा कसून शोध घेण्यात आला. त्यावेळी अटलच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.




























































