अपहरण करून शेतकर्‍याचा खून, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । नगर

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतकर्‍याचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून केला. तसेच मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

अशोक रभाजी शेंडे (वय ४५) असे खून झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. आडगाव येथे दोन दिवसांपूर्वी शेंडे कुटुंबीय व त्यांच्या शेजारी राहत असलेल्या कुटुंबासोबत वाद झाला होता. याबाबत शेंडे कुटुंबीयांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी मात्र या प्रकरणाची काहीच दखल घेतली नाही.

गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अशोक शेंडे हे त्यांच्या शेतात गेले तेव्हा सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले़. ही बाब अशोक यांच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांना फिर्याद घेण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी प्रथम फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली़. शेंडे कुटुंबीयांनी विनंती केली तेव्हा पोलीसांनी त्यांना जबरदस्तीने दोन ते अडीच तास पोलीस ठाण्यात बसवून घेतले. त्यानंतर फिर्याद दाखल केली. अपहरण झालेल्याचा तातडीने शोध घ्यावा, अशी विनंती पोलीसांना केली तेव्हा सध्या मनुष्यबळ कमी आहे. पोलीस उपलब्ध होतील तेव्हा शोध घेऊ, असे पोलीसांनी सांगितले़ अखेर अपहरण झालेल्या अशोक शेंडे याचा खून करून त्यांचा मृतदेह मारेकर्‍यांनी लोहसर-धारवाडी (ता. पाथर्डी) परिसरात आणून टाकला़. हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे.