तिन्ही कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी कायद्यांना स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र तिन्ही कृषी कायदे जोपर्यंत संसदेत रद्द केले जात नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही घरवापसी करणार नाही, असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला.

कृषी कायदे संसदेने बनवलेत, सर्वोच्च न्यायालयाने नाहीत. त्यामुळे हे कायदे संसदेतच रद्द झाले पाहिजेत. तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. 2024 सालापर्यंत आंदोलन करण्याची आमची तयारी आहे.

देशातील शेतकरी, छोटे व्यापारी, सामान्य नागरिकांचे हे आंदोलन आहे. हे आंदोलन म्हणजे वैचारिक क्रांती आहे. त्याला सत्तेच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न करू नका. वैचारिक क्रांती विचारानेच दाबता येते, असा टोला टिकैत यांनी केंद्राला लगावला.

न्यायालय हे देवासारखे असते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर काही बोलणार नाही. धोरण बनवणे हे सरकारचे काम आहे. चर्चा सुरू असताना त्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आणल्याचेही टिकैत म्हणाले.

पंतप्रधान खोटे बोलताहेत!

पंतप्रधान मोदी खोटे बोलताहेत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. आम्हाला शोधायचे आहे की ते खोटे का बोलतात? भाजपचे प्रवक्ते त्यांना खोटे बोलायला लावतात का? 18 मंत्री कृषी प्रकरणे हाताळताहेत. आम्ही पंतप्रधान आणि सरकारला शोधतोय. परंतु आम्हाला कोणी सापडलेले नाही, असेही ते म्हणाले.

तेच खरे खलिस्तानी…

येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्य़ा संचालनावेळी शेतकरी तिरंग्यासह ट्रॅक्टर संचलन करणार आहेत. राजपथावर जवानांसोबत शेतकरी असतील. पहिल्यांदा पाहतोय, तिरंगा यात्रा रोखली जात आहे. जे लोक तिरंगा यात्रेवर पाण्याचे फवारे मारतील, तेच खरे खलिस्तानी असतील, असे टिकैत यांनी या वेळी ठणकावून सांगितले.