शंभू आणि खानौरी बॉर्डरवर गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक वळण लागले. पोलीस आणि शेतकऱयांमध्ये चकमक झाली. खनौरी बॉर्डरवर पंजाबकडे जाणाऱया शेतकऱयांना पोलिसांनी रोखले. आधीच गोळीबार, अश्रुधुराचा, पाण्याचा मारा, रबरी गोळ्यांचा वर्षाव यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांना अटकाव केल्याने ते आणखी आक्रमक झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या. यादरम्यान 62 वर्षीय दर्शन सिंग या आणखी एका शेतकऱयाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यामुळे हे आंदोलन चिघळले आहे.
पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्याने प्रत्युत्तरादाखल शेतकऱयांनीही पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस जखमी झाला. सिंग यांची एकूण 9 एकर शेतजमीन असून त्यांच्यावर 9 लाखांचे कर्ज होते. मुलाच्या लग्नासाठी अलिकडेच त्यांनी हे कर्ज काढले होते. सिंग यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. सिंग यांच्याआधी 72 वर्षीय शेतकऱयाचा कार्डीयाक अॅरेस्टमुळे तर आणखी एका 63 वर्षीय शेतकऱयाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी पोलिसांच्या गोळीबारात 21 वर्षीय शुभकरण सिंग याचा मृत्यू झाला.
दिल्ली चलो आंदोलनाबाबत 29 तारखेला निर्णय
दिल्ली चलो आंदोलनाबाबत 29 तारखेला ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत ठरले. तर आज शनिवारी पँडल मार्च काढण्यात येणार आहे.
गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शुभकरणवर अंत्यसंस्कार नाही
शुभकरण सिंग याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शुभकरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका शेतकऱयांनी घेतली आहे. आमच्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत. शुभकरणच्या मृत्यूला जबाबदार पंजाब सरकारमधील अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी वार्ताहारांशी बोलताना सांगितले.
शुभकरण सिंगच्या कुटुंबियांना 1 कोटींची भरपाई
पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या 21 वर्षीय शुभकरण सिंग याच्या कुटुंबियांना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि त्याच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा आज शुक्रवारी केली. त्याचबरोबर शुभकरणच्या मृत्यूला जबाबदार असणाऱया सरकारी अधिकाऱयांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी वार्ताहारांशी बोलताना सांगितले. बुधवारी पोलीस आणि शेतकऱयांमध्ये उडालेल्या चकमकीत गोळी लागून शुभकरण सिंग याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी काँग्रेसने आणि शेतकरी नेत्यांनी पोलिसांच्या गोळीने शुभकरण सिंगचा मृत्यू झाल्याचा पुरावाच गुरुवारी सादर केला.
न्यायालयीन चौकशीची मागणी
शेतकऱयांवर पोलिसांकडून करण्यात आलेले हल्ले, गोळीबार तसेच मोठय़ा संख्येने केलेली ट्रक्टर्सची नासधूस याबाबत सर्वोच्च न्यायालयामार्फत न्यायालयीन चौकशीची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. तसेच पोलीस अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पंजाब सरकारकडे करण्यात आली आहे.
देशभरात काळा दिवस, भाजप नेत्यांचे पुतळे जाळले
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज शुक्रवारी देशभरात काळा दिवस पाळण्यात आला. शेतकरी संघटनांनी पंजाब तसेच हरयाणा सीमेवर भाजप नेत्यांचे पुतळे जाळले तसेच जोडे मारो आंदोलनही केले. लुधियानात संतप्त शेतकऱयांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, हरयाणाचे गृहमंत्री अनिलकुमार वीज यांचे पुतळे जाळले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांच्या वतीने येत्या 26 फेब्रुवारी रोजी देशभरात ट्रक्टर मोर्चा काढून महामार्ग रोखून धरण्यात येणार आहेत. तसेच 14 मार्च रोजी महापंचायतीचे आयोजन केले आहे.