
सामना प्रतिनिधी । जामखेड
सततचा दुष्काळ व नापीकीला कंटाळून शेतकरी नितीन जगन्नाथ मोहळकर ( वय 28, रा. नान्नज, तालुका जामखेड) या तरुण शेतकऱ्याने बुधवारी दुपारी 3 वाजता जुन्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई आहे. नितीनच्या नावावर साडेतीन एकर जमीन आहे. अडीच एकरवर डांळीबाची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने डांळीबाची बाग करपू लागली होती. त्यामुळे तीन महिन्यांपासून टॅंकरने पाणी घालून बाग जगवण्याची धडपड सुरू होती. एका एकरात कांदा लागवड केली होती. परंतु कांद्याचे भाव पडल्याने तो काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली होता. बॅकेचेही काही प्रमाणात कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे नैराश्याने नितीनने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दुपारी 4 वाजता नितीनची आई व इतर नातेवाईक शेतात जाण्यासाठी जुन्या घरी गेल्यावर नितीनचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. शेजाऱ्यांनी तातडीने त्याला जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी तपासणी करून नितीनला मृत घोषीत केले. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा नान्नज गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीनच्या मागे आई, वडील, पत्नी चार वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे.


























































