
सामना ऑनलाईन । लातूर
उदगीर तालुक्यातील तादलापूर इथल्या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रामेश्वर पाटील असं या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी ठिबक सिंचनाच्या अनुदान रक्कमेसाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे हे टोकाचे पाऊल उचलले. कृषि कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचन योजना राबवली जाते. या योजनेचा उद्देश शेतातील सिंचन योग्य पध्दतीने व्हावे व कमी पाण्यात उत्तम शेती व्हावी हा आहे. या योजनेचा लाभ रामेश्वर पाटील यांनी सन २०१६- १७ मध्ये घेतला होता. मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. संबधित कर्मचाऱ्याने लवकरच पैसे मिळतील असे सांगितले. मात्र अनुदानाची रक्कम काही मिळायला तयारच नाही. त्यामुळे पाटील यांनी कृषी अधिकारी यांना अर्ज देऊन थकित अनुदान तत्काळ देण्याची मागणी केली. त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत अनुदान देण्यात येईल असे स्पष्ट केले. मार्च महिना संपून जून महिना आला तरीदेखील अद्याप अनुदान न मिळाल्याने ७ जून रोजी रामेश्वर पाटील यांनी लेखी निवेदन देऊन थकित अनुदान न मिळाल्यास आठ दिवसानंतर कृषि कार्यलयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

























































