आम्ही भाजपची गुलामी करतो, पण शक्तिपीठ महामार्ग करू नका! शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

‘मुख्यमंत्री साहेब, आम्ही भाजपमध्ये येतो, भाजपची गुलामी करतो, सतरंज्या उचलतो! पण शक्तिपीठ महामार्ग करू नका…’ अशी आर्त विनवणी शेतकऱयांनी केली. शक्तिपीठ महामार्गात जमिनी जाणाऱया शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिले.

शक्तिपीठ महामार्ग हिंगोली जिल्हय़ातून जाणार असून सोनं पिकवणाऱया जमिनी सरकारकडून मातीमोल भावाने संपादित करण्यात येत आहेत. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात वसमत आणि कळमनुरीतील शेतकरी एकवटले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सध्या महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱया जमिनीचे मोजमाप करण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या विरोधात शेकडो शेतकऱयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. भाजपमध्ये गेल्यानंतर लोकांचे गुन्हे माफ होतात, चौकशा थांबवतात. त्यामुळे आम्ही भाजपची गुलामी करतो, पण आमच्या पोटावर पाय मारणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा… अशी संतप्त भावना यावेळी शेतकऱयांनी व्यक्त केली.