बळीराजाचे टेन्शन संपेना, अवकाळीनंतर मजूर टंचाई

मुसळधार पावसाने धुमाकूळ घालून हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याच्या संकटातून बाहेर पडत नाही तोच आता शेतीच्या कामांसाठी मजुरांची टंचाई झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे. अस्मानी संकटात वाचलेला भात कापायला आणि झोडायला मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या नातेवाईकांनाच ही कामे करायची वेळ आली आहे.

पूर्वी वेळेवर पाऊस पडायचा, कडक उन्हाळ्यातही नदी-नाल्यांना पाणी राहायचे. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि वाढते प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडल्याने वेळी अवेळी कधीही पाऊस पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यातून सावरत नाही तोच आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. दिवसाला 500 ते 600 रुपये देऊनही शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणी, झोडणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

जमिनी ओसाड

एकेकाळी उरण तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडीखाली न आणता त्या ओसाड ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत शेतकरी दत्तात्रेय म्हात्रे यांनी व्यक्त केली.