शेतमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या पंजाब-हरयाणाच्या शेतकऱयांनी ‘दिल्ली मोर्चा’ 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा करताच पोलिसांनी सिंघू आणि टिकरी सीमा शनिवारी उघडय़ा केल्या. पोलिसांनी दोन्ही सीमांवरील ये-जा करण्यासाठी एक मार्ग खुला केला आहे. आपल्या मागण्यांसाठी हजारो शेतकऱयांनी ट्रक्टर-ट्रॉली, ट्रकसह खनौरी आणि शंभू सीमेवर तळ ठोकला आहे.
सिंघू आणि टिकरी येथील सीमा उघडण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आता येथे सर्विस लेनवर लावलेले सिमेंटचे बॅरिकेड्स हटवले आहेत. पंजाबचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून उभे आहेत. शनिवारी सायंकाळी शेतकऱयांनी पँडल मार्च काढला. यावेळी हजारो शेतकऱयांनी शंभू सीमेवर मेणबत्त्या पेटवल्या. पंजाबी गायिका सोनिया मान यांनी जाट महासभेच्या महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी त्या पंजाब-हरयाणा सीमेवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्या जखमी झाल्या होत्या. तसेच खनौरी सीमेवर भटिंडा येथील तरुण शेतकरी शुभकरण याच्यावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. शुभकरणच्या मृतूप्रकरणी पंजाब पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवावा अशी शेतकरी संघटना आणि कुटुंबाची मागणी आहे.
आचारसंहितेतही आंदोलन सुरूच
शेतकरी आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवले असली तरी ते मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबवले जाणार नाही. गुरुवारी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही शेतकऩयांचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा शेतकरी नेते सरवन
सिंह पंधेर यांनी शनिवारी केली.
शेतकरी नेत्यांच्या अपघाताचा कट
शंभू आणि खनौरी सीमेवरील आंदोलनात हरयाणाचे 200 हून जास्त जवान सहभागी आहेत. ते शेतकरी नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते नेत्यांचा अपघात घडवू शकतात किंवा त्यांच्यावर हल्ला करू शकतात, असा गंभीर आरोप शेतकरी नेते सर्वन पंधेर यांनी केला.