मराठवाड्यातील २० लाख शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी बँकांत खेटे, सव्वासात लाख लाभार्थी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crop-loan-4

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगरसह दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने बँकांना दिल्यानंतरही बँक कर्जाची फाईल पुढे सरकली नाही. विभागात केवळ सव्वासात लाख शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचा लाभ झाला असून २० लाख शेतकरी पीक कर्जासाठी बँकांना खेटे घालून थकले आहेत.

मराठवाड्यातील शेतकरी पीक कर्जासाठी बँकांच्या खेट्या मारून त्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना बँक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली. खरीप हंगाम संपत आला असून, मराठवाड्यातील सव्वासात लाख शेतकऱ्यांना फक्त पीक कर्जाचा लाभ झाला आहे. त्यांच्या हाती पीक कर्जाची रक्कम पडली आहे. मराठवाड्यात केवळ लातूर जिल्हा बँकेने कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ओलांडले असून, बीड जिल्हा बँक कर्ज वाटपात सर्वात मागे आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर त्या-त्या जिल्ह्यांतील सर्वच राजकीय पक्षांतील स्थानिक लोकप्रतिनिधी संचालक म्हणून विराजमान आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या या लोकप्रतिनिधींनीच्या नियंत्रणातील बँकेलाही पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आलेले नाही. मराठवाड्यात सुमारे २७ लाख शेतकरी असून, या शेतकऱ्यांसाठी २०१८-१९ मध्ये विभागातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक, ग्रामीण बँकेला मिळून ११ हजार ९२७ कोटी ८४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे. १८ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील शेतकNयांना ४ हजार १८५ कोटी ६५ लाखांचे (३५ टक्के) कर्ज वाटप झाले आहे. हे कर्ज ७ लाख २५ हजार ५२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे. तर तब्बल २० लाख शेतकरी पीक कर्जापासून अद्यापही वंचित आहेत. पीक कर्ज वाटप करण्याचे राज्य शासनाने निर्देश असूनही बँका कोणालाही जुमानायला तयार नाहीत. हे वाटप कर्जाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत ग्रामीण बँकेने आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. धाराशिव जिल्ह्यात केवळ २७ टक्के तर इतर जिल्ह्यांत ५०-६० टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. लातूर जिल्हा बँक वगळता इतर सातही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला नाही.संभाजीनगर जिल्हा बँकेने २४ टक्के, जालना -५०, परभणी -५३, हिंगोली -३७, धाराशिव – ८५, बीड – ७ टक्के, नांदेड – ५० आणि लातूर – ५९ टक्के कर्ज वाटप केले आहे.