बाप्पा पावला, 2 वर्षानंतर मिळाले ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे थकित पेमेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

साईकृपा साखर कारखाना हिरडगाव शोषित शेतकरी आंदोलनाला दोन वर्षानंतर यश आले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे थकित पेमेंट 1596 रु. प्रती क्विंटल प्रमाणे देण्यात आले आहेत. साईकृपा साखर कारखाना युनिट 2 ने नगर, पुणे, बीड व सोलापूर येथील शेतकर्‍यांकडून 1850 रु. प्रती क्विंटल प्रमाणे ऊस उचलला होता. क्विंटल मागे कमी मिळालेले अडीचशे रुपये व मुळ रक्कमेवरील व्याज मिळण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

साईकृपा साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे सुमारे 38 कोटी रुपये थकित होते. थकित पेमेंट मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी साईकृपा साखर कारखाना हिरडगाव शोषित शेतकरी आंदोलन उभे केले. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सतत दोन वर्षे आंदोलने करुन पाठपुरावा करण्यात आला. तर 19 शेतकर्‍यांनी थकित पेमेंट मिळण्यासाठी न्यायालयात देखील दाद मागितली होती. या आंदोलनाने शेतकर्‍यांचे थकित पेमेंट मिळण्यास भाग पाडले. कारखान्याची शिरूर एमआयडीसी जवळील जमीन विक्री करून, शेतकर्‍यांचे थकित पेमेंट देण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवगावकर यांनी दिली.

निवडणुका जवळ आल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पेमेंट देण्यात आले आहे. कारखाना बबनराव पाचपुते यांच्या ताब्यात असल्याने सत्ताधारी कारवाई होऊ नये यासाठी दबाव आनत होते. मतापोटी घाबरुन हे पेमेंट देण्यात आले असून, दोन वर्ष शेतकर्‍यांना छळण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी केला आहे.