
चार दिवसांच्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील शेतकरी अक्षरश: उद्धवस्त झाला आहे. साडेसहा लाख हेक्टर खरिप क्षेत्र नेस्तनाबूत झाले आहे. शेतकरी चिंतेत असताना पिकविमा कंपन्यांची नौटंकी सुरू झाली आहे. ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक करत आहे. विमा कंपन्यांविरोधात बीड जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये तीन महिन्यात आठ वेळा अतिवृष्टी झाली. खरिप हंगाम धोक्यात आलेला असतानाच चार दिवस सतत झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील संपूर्ण खरिप क्षेत्र नेस्तनाबूत झाले आहे. तब्बल साडेसहा लाख हेक्टरला याचा फटका बसला आहे. अडीच ते पावणेतीन लाख हेक्टरवर उभे असलेले सोयाबीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे अशीच अवस्था कापूस क्षेत्राचीही झाली आहे. पिके तर उद्ध्वस्त झालीच आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतीही खरडून गेली आहे. हतबल शेतकरी चिंतेमध्ये आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच विमा भरलेल्या शेतकऱ्याना खिंडीत पकडण्याचे काम पिकविमा कंपन्या करत आहेत. बीड जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्र उद्धवस्त झाल्याचे चित्र असताना पुन्हा विमा कंपन्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सेल्फी काढून नुकसानीची तक्रार करण्याचे फर्मान सोडत आहे. एक तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्कची अडचण आहे.
शेतामध्ये जाणेही अवघड झाले आहे. अजूनही वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. शेतात पाणी साचले आहे. त्यात पुन्हा नुकसानीची फोटो कसे काढावेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. जे शेतकरी ऑनलाईन तक्रार नोंदवू शकत नाहीत त्यांना ऑफलाईन तक्रार नोंदविण्याची सुविंधा उपलब्ध करून देण्यात आली मात्र ही सुविधा केवळ नावालाच आहे. विमा कंपन्यांचे कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. तक्रार करण्यासाठी पुन्हा तेवढेच कागदपत्र शेतकऱ्यांना गोळा करावे लागत आहे. ऑफलाईन तक्रारीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खिशात दमडीही नसणाऱ्या शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावून ऑफलाईन तक्रार द्यावी लागत आहे. पिकविमा कंपन्यांची मुजोरीपणा शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे, त्यांची अडवणूक करण्याचे आणि पिळवणूक करण्याचे काम पिकविमा कंपन्या करत आहेत. बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.



























































