मोदी सरकार घाबरले! शेतकऱ्यांची सोशल मीडिया अकाऊंटस् बंद केली!! शंभू सीमेवर आंदोलनाचा भडका

शेतमालाला किमान हमीभाव देणारा कायदा आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून शंभू आणि खानौरी सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात आणखी आक्रमक झाले आहेत.  शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून मोदी सरकार प्रचंड घाबरले असून त्यांची तब्बल 177 एक्स सोशल मीडिया अकाऊंट बंद केली आहेत. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाशी निगडित सर्व पोस्ट हटवण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यासंबंधीचे निर्देश एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिले.

पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्लीत धडक देण्याच्या तयारीत असताना शेकडो एक्स अकाऊंट उघडण्यात आली होती. शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळत चालल्याने शेतकरी संघटनांची तब्बल 177 एक्स अकाऊंट आणि लिंक ब्लॉक करण्याचे तसेच पोस्ट हटवण्याचे आदेश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले होते. गृह मंत्रालयाने शेतकरी संघटनांच्या एक्स अकाऊंटवर कारवाई करण्याची विनंती केली होती. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाशी निगडित पोस्ट कायदेशीर दंडास पात्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होत आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करताना केवळ हिंदुस्थानसाठीच ही कारवाई मर्यादित असल्याचे एक्सने म्हटले आहे.

शासकीय आदेश असल्याने शेतकरी संघटनांशी निगडित एक्स अकाऊंट ब्लॉक केली असून पोस्टही हटवण्यात आल्याचा खुलासा एक्सने केला आहे. तसेच आम्ही या आदेशाशी सहमत नसून व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, सर्वांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे असेही एक्सने स्पष्ट केले.

पोलिसांच्या गोळीबारात 21 वर्षीय शुभकरण सिंग याचा मृत्यू झाल्याप्रकरणी हरयाणाचे गृहमंत्री आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेते बलवीर राजेवाल यांनी केली आहे. शुकरण सिंग याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित केले असून उद्या सायंकाळी दिल्ली चलो मार्चबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सर्वन सिंह पंधेर यांनी सांगितले.

26 फेब्रुवारीला महामार्ग रोखून धरणार

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या छावण्या आणि ट्रक्टर्सची नासधूस केली. अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या, गोळीबार केला, पाण्याचा मारा केला. यात तब्बल 167 शेतकरी जखमी झाले तर 6 शेतकरी बेपत्ता असल्याचा दावा शेतकरी नेते बलदेव सिंह यांनी केला.

जनताच मोदींना उत्तर देईल– राहुल गांधी

शेतकरी संघटनांची एक्स अकाऊंट ब्लॉक करून मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. याचे सडेतोड उत्तर लोकसभा निवडणुकीत जनताच देईल, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. जर शेतकऱ्यांनी एमएसपीबद्दल विचारले तर त्यांना गोळय़ा घातल्या जातात ही लोकशाही का? जेव्हा तरुण सरकारमधील मंत्र्यांना, नेत्यांना भेटण्याबद्दल विचारतात तेव्हा त्यांना नकार दिला जातो, त्यांचे ऐकून घेतले जात नाही, ही लोकशाही आहे का? प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवली जातात. कलम 144 लागू केले जाते. इंटरनेट बंद केले जाते,  अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या जातात ही लोकशाही आहे का?  माजी राज्यपाल सत्यपाल मालिक यांनी खरं सांगितल्यामुळे त्यांच्यामागे सीबीआयचा ससेमीरा लावला ही लोकशाही आहे का? असे सवाल राहुल गांधी यांनी केले आहेत.

पोलिसांच्या गोळीबाराचे पह्टो जारी

सरवन सिंह पंधेर यांनी आज पोलिसांनी गोळीबार केल्याचा पुरावा देणारे एक छायाचित्र जारी केले. यात पोलीस गोळीबार करताना दिसत आहेत. हा पुरावा ग्राह्य धरून पंजाब सरकारने हल्लेखोरांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंधेर यांनी केली आहे.

पोलिसांच्या कारवाईविरोधात 26 फेब्रुवारीला ट्रक्चर मोर्चा काढून महामार्ग रोखून धरण्यात येणार आहे, तर 14 मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.