शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी मिळावी – सुषमा अंधारे

sushma-andhare-manchar

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांची दोन पिके वाया गेली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटी व अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांची कांदा, ज्वारी, बटाटा व इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली असून येथील शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्जमाफी व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकार दरबारी करणार असल्याचे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील कुदळवाडी, कोल्हारवाडी, भावडी, थुगाव, कुरवंडी आदी गावाचा पिक पाहणी दौरा सुषमा अंधारे यांनी केला असता त्यांनी शेताच्या बांधावर बसूनच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा, पिक पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी त्या आंबेगाव तालुक्यात आल्या होत्या, यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, उपजिल्हा प्रमुख दिलीप पवळे, भरत मोरे, अरुण बाणखेले, महेश घोडके, शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी त्या म्हणाल्या की सातगाव पठार भागात सुमारे तीन हजार एकर क्षेत्रात कांदा लागवड झाली असून शेतकऱ्याने एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च केला आहे. पिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढले असून रविवारी झालेल्या गारपिट व अवकाळी पावसामुळे पिके पूर्ण नष्ट झाली असून पिक आले नाहीतर पीक कर्ज कसे भरणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. असून सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करावे तसेच पीक कर्जातून ज्वारी पिकास वगळण्यात आले असून केंद्र सरकारच्या कृषी धोरणानुसार हे वर्ष हिंदुस्थानचे कृषी तृणधान्य वर्ष जाहीर केलेले आहे, आणि नुकसान भरपाईच्या यादीतून ज्वारी,ऊस ही पिके वगळली आहेत.

या परिसरात ज्वारीचे पीक देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत आहेत, जर तृणधान्य वर्ष जाहीर केलेले असताना त्या मध्ये ज्वारी प्रमुख पिक आहे, त्या साठी वेगळ्या सेवा सुविधा असल्याचं पाहिजे. येथे ज्वारीचे देखील नुकसान झाले आहे, आता जी ज्वारी शेतात दिसत आहे ती जनावरे सुद्धा खाऊ शकणार नाही. ज्वारी हे पीक महत्त्वाचे असून ज्वारीलाही नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत घ्यावे अशी मागणी केली आहे.

आंबेगाव तालुक्याचे आमदार व सध्या सरकारमध्ये असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेली 35 वर्ष सातगाव पठारच्या पाणी प्रश्नावर राजकारण करत आपली खुर्ची शाबूत ठेवली आहे. कळमोडीचे पाणी चासकमानमध्ये आणणार त्याच चासकमानचे पाणी सातगाव पठार परिसरात येणार असे सांगून लोकांना खेळवत ठेवले आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही, उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे, रात्रीची वीज असल्याने अनेकदा रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरावे लागते,त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ले होतात अशा सर्व बाजूने शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या.