शेती झाली तोट्याची; मजूर, सालगडी मिळेनात, मशागतीचे दर वाढले

अहमदपूर तालुक्यात खरीप हंगाम कोरडा गेल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी पाणीच नसल्याने रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा पिकाने साथ दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडीच बिघडली आहे. शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. मात्र मजुराची व सालगडयांची कमतरता आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे वाढलेले दर यामूळे शेतीचे आर्थिक गणित बिघडलेले आहे.

अलीकडच्या काळात महागाईमुळे यंत्राच्या किमती, डिझेल, पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यातच शेतीचा वाढता खर्च ,अवकाळी पाऊस शेतमजुरांची कमतरता जाणवत आहे. याआधी बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी, बियाणे पेरणी होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक खर्च येत नव्हता. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विक्री केली. आता शेतीतील बहुतांश कामे ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मात्र, शेतीचे मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्न शेतीमालाला मिळणारा बाजारभाव याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. त्यातच पुढील कालावधीत शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी आर्थिक तजविज करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा बँकेत, खाजगी सावकाराकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत.