फास्ट लोकलने रेल्वेच्या इंजिनिअर व ट्रॅकमनला उडविले, खार स्थानकाजवळील घटना

1836

पश्चिम रेल्वेच्या एका इंजिनिअरसह दोन कर्मचार्‍यांचा खार येथे जलद लोकलने उडविल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. भरपावसात काम करीत असलेले अंधेरीचे सेक्शनचे सिनियर सेक्शनल इंजिनिअर राजकुमार शर्मा आणि ट्रॅकमन्स सखाराम सावंत यांचा यात दुदैवी मृत्यू झाल्याने रेल्वे कामगारांत हळहळ व्यक्त होत आहे.

मोटरमन जीवन कनोजिया चालवित असलेली अप जलद लोकल खार रोड पास करताना गाडी हॉर्न वाजवित वळणावरून भरधाव वेगाने जात असताना अचानक दोन व्यक्ती ट्रॅकवर दिल्याने त्यांनी इर्मजन्सी ब्रेक दाबला. ट्रॅकवरील दोघा जणांनी ट्रॅकशेजारी खाली वाकून बसण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीची त्यांना धडक बसून ते जखमी झाले. त्यानंतर मोटरमन कनोजिया यांनी नियंत्रण कक्षाला आणि गार्डला कळविले. रात्रीच्या 12.08 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दोघांना गाडीत स्ट्रेचरवर चढवून वांद्रे येथे आणण्यात आले.

भाभा हॉस्पिटल येथे इंजिनिअर राजकुमार शर्मा आणि ट्रॅकमन सखाराम सावंत यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. पश्चिम रेल्वेवर याआधी अपघात झाल्याने तपासणीसाठी घटनास्थळी जाणार्‍या एका स्टेशन मास्तरचा लोकलने उडविल्याने मृत्यू झाला होता. या दोघा कर्मचार्‍यांनी रेडीयमचे स्ट्रीप असलेले जॅकेट परिधान केले नव्हते असा मोटरमनचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या