उपवासाचे असेही फायदे

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

नवरात्रीचे उपवास आरोग्यदायी कसे करावेत आणि त्यापासून काही त्रास होऊ नये म्हणून आपण योग्य तो आहार कसा घ्यावा हे पाहिले, पण आता उपवास सोडताना तितकीच काळजी घेतली पाहिजे. नऊ दिवस उपवासाचे खाल्ल्यानंतर एकदम खूप जेवण घेणे किंवा अरबटचरबट खाणे योग्य नव्हे. कसे ते पाहूया.

हे करा-

नवरात्रीचा उपवास सोडताना पुरणा- वरणाचे जेवण असते. त्यामुळे जेवणात वरणभात, पुरणपोळ्या असतात. त्यामुळे हे जेवण जेवताना पुरणपोळी बेताने घ्यावे. त्याचबरोबर वरणभात, भाजीही खावी. त्याने जेवल्याचे समाधान मिळते आणि पोटात भातामुळे थंडावा राहतो. पुरणाच्या जेवणात तळलेला पदार्थ आवर्जून असतो. त्यामुळे तोही बेताने खावा.

उपवासानानंतर आपल्या पचनशक्तीवर एकदम भार पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे जास्त गोड किंवा तळलेले पदार्थ टाळावेत. त्याचबरोबर बाहेरचे खाणे टाळावे.

सकाळी न्याहारीच्या वेळी हलका आहार घ्यावा. लिंबूपाणी, ताक, कोकम सरबत यांचा समावेश थोडय़ा थोडय़ा वेळाने करावा. त्याचबरोबर न्याहारीनंतर दोन तासांनी एखादे फळ खावे. त्यामुळे जेवायला बसल्यावर खूप खाल्ले जात नाही.

दुपारचे जेवण बेताचे घेतले की, संध्याकाळी परत हलका आहार घ्यावा. सुका मेवा, दूध किंवा फळे खावीत.मग रात्रीच्या जेवणात मोजका, पौष्टिक आहार घ्यावा. जेवणात दही, दूधभाताचा समावेश असावा. त्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होत नाही.

अशा प्रकारे बेताचा, पण ऊर्जादायी आहार घेऊन उपवास सोडणे गरजेचे असते. त्यामुळे उपवासाचा त्रास होत नाही. एकदोन दिवसांत हळूहळू रोजच्या आहाराचा समावेश करावा.

आपली प्रतिक्रिया द्या