
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या यहुदी नागरिकांवर बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे. सीबीसी न्यूजने अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर हे पितापुत्र असल्याचेही समोर आले आहे.
रविवारी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या यहुदी नागरिकांवर दोन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री मोठय़ा प्रमाणावर यहुदी नागरिक त्यांचा हनुक्का हा सण साजरा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गोळा झाले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.
या हल्ला करणारे दोघेही पिता पुत्र असून त्यातील पित्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे तर मुलगा जखमी झाला असून त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
तीन संशयितांना अटक
सिडनी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. नवीद अक्रम नावाच्या तरुणाला जखमी दहशतवाद्यासोबतच अटक केली होती. तर एक पुरुष आणि एका महिलेला बॉनिरीग भागातून अटक करण्यात आली. त्यांचा आजच्या गोळीबाराशी थेट संबंध आहे. त्यांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास करण्यात येत आहे.
29 वर्षांनी ऑस्ट्रेलियात मास शूटिंग
ऑस्ट्रेलियात अशा मास शूटिंगच्या घटना क्वचित घडतात. यापूर्वी 1996मध्ये पोर्ट आर्थर येथे एका जणाने गोळीबार केला होता. त्यात 35 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एप्रिल 2024मध्ये एकाने चाकूने हल्ला केला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या हल्लेखोराला गोळी घालून ठार करण्यात आले होते.






























































