आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद

अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या नराधम पित्याला पैठण पोलिसांनी सव्वादोन महिन्यानंतर जेरबंद केले.

22 फेब्रुवारी रोजी याबाबत पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी आंतोन श्यामसुंदर गायकवाड याच्यावर ‘पोक्सो’सह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे आरोपीला अहिल्यानगर जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे. तो पिडीतेच्या आईसोबत नाथमंदिर परिसरात राहात होता. त्याने 14 वर्षीय सावत्र मुलीवर सलग 6 महिने अत्याचार केले. अत्याचार करू न दिल्यास तुझ्या आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन!’ अशी धमकी देत या नराधमाने हा घृणास्पद प्रकार चालवला होता. 14 वर्षीय पीडितेच्या आईने तक्रार दिल्यावर ही कारवाई करण्यात आली.

पिडीतेची 35 वर्षीय आई ही अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. गावातीलच अंतोन शामसुंदर गायकवाड यांच्यासोबत ती बायको प्रमाणे राहते. दरम्यान पिडीतेची आई अधूनमधून तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मुलीला भेटायला अहिल्यानगर जिल्ह्यातील गावी जात असे. तिच्या अनुपस्थितीत आरोपी अंतोन गायकवाड याने अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केले.

पीडित मुलीने हिंमत करून सर्व माहिती आईला कथन केली. पीडित मुलीच्या आईने तत्काळ पैठण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी विविध कलमांद्वारे नराधम सावत्र पित्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून नराधम पिता आंतोन श्यामसुंदर गायकवाड हा पोलिसांना हुलकावणी देत होता.

निर्ढावलेल्या आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की

आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागापूर एमआयडीसी भागात असल्याची माहिती पैठण पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस पथकाने सापळा रचला. व उसाच्या फडातून बलात्काऱ्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यात सहायक फौजदार सुधीर वाहुळ व पोलिस नाईक राजेंद्र जीवडे यांना किरकोळ दुखापत झाली. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे व ‘पिंक’ पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी ही कामगिरी केली. पैठण न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.