ह्रदयद्रावक घटना… मुलाच्या निधनाच्या धक्क्याने वडिलांनीही प्राण सोडला

सामना प्रतिनिधी । राहाता

बसच्या धडकेने जखमी झालेल्या तरुणाची २० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली. मुलाच्या निधनाच्या धक्क्याने वडिलांनीही प्राण सोडला. राहाता येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी राहाता शहरातील शिवाजी चौकात एका वृद्धाला वाचविताना भरधाव एस टी बस ने रस्त्याच्या विरुद्ध बाजूकडील पानटपरीला धडक दिली. पानटपरीत असलेला तरुण ऋषीकेश आहिरे यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शिर्डी सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमधे उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने डॉक्टरांनी त्याला पुण्याला हलविण्यास सांगितले. पण जवळ पैसे नसल्याने तरुणावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. अखेर जखमी ऋषीकेशची मृत्यूसोबत सुरू असलेली २० दिवसाची झुंज संपली. २० जुलै रोजी त्याने प्राण सोडले. मुलाचा मृत्यू झाला हा आघात सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्याचे वडील कानीफनाथ आहिरे (४०) यांनीही प्राण सोडला.

ऋषीकेश हा बारावीत शिकत होता. वडिलांना मनक्याच्या आजारामुळे अपंगत्व आले ते आठ वर्षापासून अंथरूनाला खिळून होते. घरातील कर्ता रऋषीकेशच होता. कॉलेज करून सकाळी रस्त्याच्याकडेला पानटपरी चालवून तो वडिलांवर उपचार करत होता. तसेच स्वत:चा व लहान भावाचा शिक्षणाचा खर्चही तोच भागवत होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने व त्या धक्क्याने वडिलांचाही मृत्यू झाल्याने आहिरे कुटुंबावर आभार कोसळले आहे.