
सामना ऑनलाईन, बरेली
तिहेरी तलाकविरोधी कायदा करूनही तलाक देण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने ३ वेळा तलाक दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे दोघेजण दिरासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करायला लागल्यानंतर या महिलेने हिम्मत दाखवत पोलिसांत तक्रार केली, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
जुलै २००९ साली या महिलेचं लग्न एका ड्रायव्हरशी झालं होतं. पीडित महिलेला गर्भधारणा होत नसल्याने नवऱ्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी या महिलेला त्रास द्यायला सुरूवात केली. फेब्रुवारी २०११ मध्ये नवऱ्याने महिलेला तलाक दिला आणि महिलेचा विरोध असतानाही सासऱ्यासोबत निकाह हलाला करण्यास भाग पाडलं. १ जुलै २०११ रोजी या महिलेचा आणि तिच्या सासऱ्याचा निकाह झाला. ९ दिवस रोज सासरा या महिलेवर बलात्कार करत होता. १० व्या दिवशी सासऱ्याने तिला तलाक दिला. नोव्हेंबर २०११ साली महिलेच्या नवऱ्याने पुन्हा तिच्यासोबत निकाह केला. त्यानंतरही सासऱ्याने तिच्यावर बलात्कार करणं सुरूच ठेवलं होतं. सात वर्ष या नरकयातना भोगल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार करायचं ठरवलं. मात्र समाजात आपली बदनामी होईल या भीतीने सासऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार केली नाही.
महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर तिच्या सासरची मंडळी आणखीनच भडकली , त्यांनी महिलेवर दिरासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरूवात केली. याला नकार दिल्याने तिला नवऱ्याने ३ दिवस कोंडून ठेवलं. या तीन दिवसात अन्न सोडाच पाण्याचा एक थेंबही मला देण्यात आला नाही असं या महिलेने सांगितलं आहे. अखेर हिम्मत दाखवून या महिलेने पुन्हा पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळी कहाणी त्यांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी नवरा, सासरा, नवऱ्याचे ३ भाऊ असे मिळून एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सासऱ्याविरोधात बलात्काराचा तर नवऱ्याविरूद्ध अनैर्गिक संभोग केल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.



























































