
सामना ऑनलाईन । सिल्लोड
सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाचा बापाने कुऱ्हाडीने तुकडे करून खून केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे उघडकीस आली. शेतातील वखारीत खून करून त्याचा मृतदेह उकिरड्य़ावर गाडला. पोलिसांनी मृतदेह उकरून शवविच्छेदन करून मंगळवारी अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या मुलाचे नाव प्रभाकर दादाराव कोल्हे (४५, रा. केळगाव) असे आहे तर दादाराव कोल्हे (६५, रा. केळगाव) असे खून करणाऱ्या वडिलाचे नाव आहे. त्याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून बुधवारी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रभाकर कोल्हे हा १४ जुलै रोजी घरातून बेपत्ता होता. तो हरवला असल्याची तक्रार वडिलांनी पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी मिसिंग केस दाखल केली होती. याचा शोध घेत असताना पोलिसांना वडिलावर संशय आला. त्याच्याशी विचारपूस करीत असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास पोलिसी खाक्या दाखविताच मीच मुलाचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. यावरून मंगळवारी दुपारी पोलिसांनी आरोपीस केळगाव येथे नेले. तेथे कुऱ्हाडीने घाव घालून मुलांचे तुकडे करून त्याने उकीरड्य़ाखाली गाडले होते. त्याचा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला. त्याच्यावर शवविच्छेदन करून विसेरा काढून केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
खुनाचे काही पुरावे पोलिसांच्या हाती
वडिलाने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा शेतातील वखारीत कुऱ्हाडीने घाव घालून निर्दयीपणे त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते. ती कुऱ्हाड पोलिसांनी वखारीतून जप्त केली. रक्ताने माखलेल्या गोधड्य़ा, शाल त्याने केळगावच्या नदीत फेकल्या होत्या.
यांनी केला तपास
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू पल्हाळ, पोलीस नाईक विलास सोनावणे, विठ्ठल डोके, विकास नायसे यांनी यशस्वी तपास केला.
आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने तुकडे करून खून करून मृतदेह उकिरड्य़ावर गाडला. पोलिसांनी मृतदेह उकरून शवविच्छेदन करून मंगळवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यातील आरोपी दादाराव कोल्हे यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यामुळे मुलाची हत्या एकट्य़ा बापानेच केली की, अजून या कटात कोणी सहभागी आहे, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.




























































