
गाडी विक्रीच्या व्यवहार मध्यस्थी केल्यानंतर फसवणूक झाल्याप्रकरणी बाप-लेकाने वाहन विक्री करणाऱ्या एका एजंटचे अपहरण केल्याची घटना काल मार्केटयाड परिसरात घडली.
रवीकांत मोरे (वय 45) असे अपहरण करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बसप्पा कुंभार आणि श्रीकांत बसप्पा कुंभार (दोघेही रा. जत, सांगली) यांच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीकांत वाहनविक्रीचे एजंट आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका वाहनाची बसप्पा कुंभार यांना विक्री केली होती. संबंधित वाहन मोरे यांनी तोडकरकडून घेतले होते. मात्र, तोडकरने वाहनाची परस्पर विक्री साळुंके या व्यक्तीला केली होती. त्यामुळे साळुंकेने कुंभार याच्या ताब्यातील वाहन पोलिसांच्या मदतीने सोडवून घेतले.
त्यानंतर कुंभार बाप-लेकाने रवीकांत मोरे याला गाठून पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांना मोटारीत टाकून अपहरण केले. याप्रकरणी रवींकांत यांची सुटका करण्यात आली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी सांगितले.
























































