
देशातील अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या डिसेंबरमध्ये एफडीचे व्याजदरात वाढ केली आहे. हे व्याजदर 2 कोटींपेक्षा कमी रकमेसाठी लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सलग पाचव्यांदा रेपो रेट 6.5% कायम ठेवल्याने एफडी दरांमध्ये बदल झाला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक ऑफ इंडिया, डीसीबी बँक, या नऊ बँकांनी विविध कालावधीसाठी ठेवींचे दर वाढवले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन व्याजदर 27 डिसेंबरपासून लागू केले आहेत. बँकेने एफडीवरील व्याजदरात 50 बेसिस पाँईट्सने वाढ केली आहे. एक ते दोन वर्षांपेक्षा कमी, दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी आणि पाच ते दहा वर्षे वगळता सर्व कालावधींसाठी व्याजदर वाढवले आहेत. सात दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी 25 बेसिस पाँईट वाढवून 4.75 टक्के करण्यात आले आहे. 180 ते 210 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करून 5.75 टक्के, 211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची वाढ करून सहा टक्के आणि तीन वर्षांपासून पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 25 बेसिस पॉइंटची वाढ करून व्याजदर 6.75 टक्के केला आहे, याव्यतिरिक्त ज्येष्ठ्य नागरिकांना दिलासा देत सात दिवस ते दहा वर्षांच्या एफडीसाठी चार टक्के ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येणार आहे.
बँक ऑफ बडोदा नवे एफडी दर 29 डिसेंबर पासून एफडी व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने विविध कालावधीसाठी वाढ केली आहे. बँकेने आता सामान्य ग्राहकांसाठी 4.25 टक्के, ते 7.25 टक्के पर्यंत वाढ केली आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर बँक ऑफ इंडियाने 2 कोटी आणि त्याहून अधिक ठेवीवर एका वर्षाच्या कालावधीकरीता 7.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच हे नवे दर 1 डिसेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.
एचडीएफसी बँकेने 28 डिसेंबर 2023 पासून नवे दर लागू केले आहेत. मात्र बँकेने ठेवीची मूदत पूर्ण होईपर्यंत न काढता येणाऱ्या एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. आयसीआयसीआय बँकेने देखील एफडीदर 28 डिसेंबर पासून 2 कोटी आणि त्याहून अधिक पण 5 कोटींहून पेक्षा कमी एफडींसाठी व्याजदर सुधारित केले आहेत.
नवे दर माहित करून घेण्यासाठी किंवा व्याजदरातील बदल तपासण्यासाठी बँकांच्या अधिकृत संकेतस्थळांवर माहिती देण्यात आली आहे. माहितीपूर्ण गुंतवणूक करण्याकरीता प्रत्येक बँकेच्या अटी व शर्तीं काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
























































