फेडरर @101, जॉन इस्नरला हरवत मियामी स्पर्धा जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मियामी

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस स्टार रॉजर फेडरर याने रविवारी कारकीर्दीत 101 व्या जेतेपदाला गवसणी घातली. सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकणार्‍या या पठ्ठय़ाने जॉन इस्नरला 6-1, 6-4 अशा फरकाने पराभूत करीत मियामी टेनिस स्पर्धेचा झळाळता करंडक पटकावला.

रॉजर फेडररने अमेरिकन टेनिसपटू जॉन इस्नरचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. त्याने 63 मिनिटांमध्ये सामना खिशात घातला. टूअर फायनल्समध्ये धडक मारण्याची रॉजर फेडररची ही 154 वी खेप होती. तसेच त्याचे हे 50 वे एटीपी मास्टर्स जेतेपद ठरले आहे. फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅमसाठी सज्ज होत असलेला रॉजर फेडरर आता मॉण्टेकार्लो स्पर्धेत न खेळता मे महिन्यात होणार्‍या माद्रिद ओपनमध्ये सहभागी होणार आहे.

चौथ्या स्थानावर झेप

मियामी स्पर्धा जिंकणार्‍या रॉजर फेडररला रँकिंगमध्येही झेप घेता आली आहे. तो आता चौथ्या स्थानावर विराजमान आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविच पहिल्या स्थानावर असून स्पेनचा रफाएल नदाल दुसर्‍या स्थानावर आहे. ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव तिसर्‍या स्थानावर आहे.

ओसाका-हालेपमध्ये चुरस

नाओमी ओसाका महिलांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असून सिमोना हालेप दुसर्‍या स्थानावर आहे. सिमोना हालेपने मियामी टेनिस स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यामुळे तिने पहिल्या स्थानावरील नाओमी ओसाकाला आव्हान दिले आहे. दोघांमध्ये पहिल्या स्थानासाठी चुरस लागलेली दिसणार आहे.