महिलांच्या गाऊनच्या बटणातून कोकेनची तस्करी, तिघांना अटक

महिलांच्या गाऊनच्या बटणातुन कोकेनची तस्करीचा पर्दाफाश महसूल गुप्त वार्ता संचलनालयाने ( डीआरआय) ने केला. डीआरआयने कारवाई करून 396 ग्रॅम कोकेन जप्त केले. या प्रकरणी तिघांना डीआरआयने अटक केली. गेल्या दहा दिवसातील डीआरआयची ही चौथी कारवाई आहे.

ड्रग्ज माफिया विरोधात डीआरआयने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. दक्षिण आफ्रिका येथून एक मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या हबमध्ये पार्सल येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीची डीआरआयच्या अधिकाऱ्य़ांनी शहनिशा केली. त्यानंतर डीआरआयचे पथक एका कुरिअर कंपनीच्या हबमध्ये गेले. तेथून एक पार्सल जप्त केले.

त्या पार्सलमध्ये महिलांचे गाऊन होते. त्या गाऊनला जास्त बटणे असल्याचे डीआरआयच्या निदर्शनास आले. डीआरआयच्या अधिकाऱ्य़ांनी त्या गाऊनवर लावलेली बटणे उघडली. त्या बटणाच्या आत मध्ये कोकेन होते.  ते पार्सल घेण्यासाठी एक जण कुरिअर कंपनीच्या हब जवळ येणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्य़ांना मिळाली.

त्या माहितीवरून डीआरआयने एकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत एका नायजेरियनचे नाव समोर आले. त्यानंतर डीआयआरने एका नायजेरियनला ताब्यात घेतले. तो ते पार्सल घेणार होता. डीआरआयने त्या दोघांची कसून चौकशी केली. चौकशीत आणखी एका नायजेरियनचे नाव समोर आले.

त्याच्या अटकेसाठी डीआरआयचे पथक तळोजा येथे गेले. तेथून एका नायजेरियनला डीआरआयने अटक केली. तो ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य असल्याचे डीआरआयच्या तपासात समोर आले. त्या तिघांना डीआरआयने अटक करून न्यायालयात हजर केले. तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या