लाच मागणारी महिला निरीक्षक निलंबित, कॉन्स्टेबलवरही कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नो पार्किगमध्ये दोन बसेस पार्क करण्यासाठी दरमहा तीन हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम कॉन्स्टेबलकरवी घेणारी महिला पोलीस निरीक्षक शीतल मालटे व कॉन्स्टेबल तुषार चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शीतल मालटे ही आझाद मैदान वाहतूक विभागाच्या प्रभारी म्हणून कार्यरत होती. त्यांच्या हद्दीत दोन बसेस पार्क केल्या जात असल्याने त्या बसेसवर वारंवार कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे बसचे मालक मालटे यांना भेटले. तेव्हा दोन्ही बसेसवर कारवाई व्हायची नसेल तर दरमहा तीन हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे बसमालकाने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने मालटे यांच्या सांगण्यावरून तुषार चव्हाण यांना तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने मालटे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता दहा बंद लिफाफ्यांमध्ये तब्बल चार लाख 81 हजार इतकी रोकड सापडली होती. त्यामुळे या गुह्यात मालटे आणि चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली होती. तर आता दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.