पणन महासंघात खत विक्रीत घोटाळा व्यवस्थापक एन. बी. यादव निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्य सहकारी पणन महासंघाच्या सातारा आणि धाराशीव येथील जिल्हा कार्यालयांमध्ये झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या खत विक्री घोटाळ्यामध्ये तत्कालीन व्यवस्थापक एन. बी. यादव यांना निलंबित करून तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता यांची चौकशी करण्याची घोषणा सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केली.

राज्य पणन महामंडळातील सातारा आणि धाराशीव येथे सुमारे पाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. खाजगी वितरक पारसेवार ऍण्ड फर्टिलायझर यांना फायदा होण्यासाठी दहा कोटींचे खत परत देऊन फेडरेशनचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान यादव यांनी केले. तसेच उधारीने खत विक्री केली. याप्रकरणी पारसेवार आणि बी. आर. पाटील, तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी यांच्याविरुद्ध धाराशीव शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती, परंतु ही केस क्लिष्ट असल्याने त्यांनी गुन्हा नोंदवला नाही अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी सभागृहात दिली.

या प्रश्नावर मनीषा कायंदे यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाई गिरकर, जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. या घोटाळ्याला सर्वस्वी जबाबदार यादव आणि त्यांना पाठीशी घालणारे माजी व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता यांचे संगनमत कारणीभूत आहे. त्यामुळे यादव यांना निलंबित करून गुप्ता यांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली.

माजी व्यवस्थापक गुप्ता यांची चौकशी
सहकारमंत्री पाटील यांनी यादव यांची विभागीय चौकशी करू असे आश्वासन दिले, परंतु त्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनीदेखील आपण अधिकाऱयांना पाठीशी घालू नका. सदस्यांच्या भावना तीव्र आहेत असे सांगितले. यादव यांना यापूर्वी निलंबित केले त्याची शिक्षा म्हणून त्यांचे वेतन रोखण्यात आले असताना पुन्हा त्याच पदावर काम करून भ्रष्टाचार करत आहेत. त्यांना बडतर्फ करावे अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर सहकारमंत्र्यांनी यादव यांना निलंबित करून गुप्ता यांची चौकशी करण्याचे घोषित केले.