मिरजेतील तंतुवाद्य व्यवसायाने टाकली कात, पारंपारिक रंगांतील तंतुवाद्ये आता आकर्षक रंगात उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तंतुवाद्यांचे माहेरघर’ म्हणून प्रसिद्ध असणाऱया मिरजेतील तंतुवाद्य व्यवसायाने आता कात टाकली असून, येथील युवा तंतुवाद्य कारागिरांनी तंतुवाद्यनिर्मितीत नवनवे प्रयोग केले आहेत. पूर्वी पारंपरिक रंगांत उपलब्ध असणारी तंतूवाद्ये आता आकर्षक अशा विविध रंगांत उपलब्ध होऊ लागली आहेत. सतारी, तंबोरे यांना पूर्वीच्या लाखेच्या रंगाऐवजी आता रंगीबेरंगी मेटॅलिक रंग देण्यात येऊ लागले आहेत. विविध रंगांतील या सतारी आणि तंबोऱयांना देश-परदेशांतील कलाकारांकडून पसंती मिळत आहे.

मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथून देश-परदेशात तंतुवाद्यांची निर्यात केली जाते. तंबोरा, सतार, दिलरूबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकित कलाकारांकडून मागणी असते. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या तंतुवाद्यनिर्मितीच्या रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक कारागीर यामध्ये कार्यरत आहेत. तंतुवाद्य तयार करणाऱया कारागिरांची एक पेठच येथे वसली आहे.

फरीदसाहेब यांचा वारसा तरुण कलाकार पुढे नेत आहेत. हे युवा कारागीर आता तंतुवाद्यनिर्मितीत आधुनिक प्रयोग करीत आहेत. पारंपरिक वाद्यनिर्मितीला नव्या प्रयोगांची जोड देत जुनी वाद्ये अधिक लोकप्रिय कशी होतील, याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयोगाचा एक भाग म्हणून तंतुवाद्यांना पारंपरिक रंग न देता ग्राहकांना आकर्षिक करतील असे रंग आता देण्यात येऊ लागले आहेत.

मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करून तो तंतूवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. बत्ताशी आणि पत्रीलाख पातळ करून त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकिरी, जामून यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ट कारागिरांनी हातखंडा मिळविला होता.

गेली अनेक वर्षे स्पिरिटमिश्रित पारंपरिक रंगांचा वापर तंतुवाद्यांसाठी होत होता. आता मात्र हीच तंतुवाद्ये नव्या, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यासाठी मेटॅलिक रंगांचा वापर होऊ लागला आहे. चारचाकी गाडय़ांना देण्यात येणारे आकर्षक रंग येथे तंतुवाद्यांना वापरण्यात येत आहेत. त्यासाठी पूर्वीची हाताने रंग देण्याची पद्धत आता बंद झाली असून, प्रेद्वारे हे रंग तंतूवाद्यांना देण्यात येतात. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या रंगातील सतार आणि तंबोरे तयार करण्यात येत आहेत. ही तंतूवाद्ये आवाजाच्या बाबतीत दर्जेदार तर आहेतच, शिवाय आकर्षक अशा रंगांत मिळत असल्याने ग्राहकांची पसंती त्याला मिळत आहे.

मिरजेत तयार होणारी तंतुवाद्ये ही पारंपरिक रंगांत न करता ती ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या रंगात करून देत आहोत. पूर्वी असे रंग गिटारींना वापरले जायचे. आता याच रंगांमध्ये तंबोरे आणि सतारी बनवून देण्याची मागणी होत आहे. विशेषतः अशा रंगीबेरंगी तंतुवाद्यांना परदेशातून खूप मागणी आहे. मात्र, रंगीत तंतुवाद्ये बनविताना ती पूर्वीप्रमाणे दर्जेदार राहतील, याची खबरदारी घेण्यात येत आहे.
– नईम सतारमेकर, युवा तंतुवाद्यनिर्माता.