फ्रान्स क्रांती पथावर – सलग दुसऱयांदा गाठली उपांत्य फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुद्दई लाख बुरा चाहे, वही होता है, जो मंजूरे खुदा होता है… इंग्लंडने फ्रान्सपेक्षा जास्त वेळ सामन्यावर नियंत्रण राखले. गोलची संधीही त्यांनीच अनेकदा निर्माण केली. दोनदा पेनल्टी किकही इंग्लंडला मिळाली. गोलपोस्टजवळ इंग्लंडचेच फटके अधिक पोहोचले, तरीही फ्रान्सने इंग्लंडवर 2-1ने मात करीत नियोजित वेळेतच सामना जिंकून क्रांती पथावर आपली दौड सुरू ठेवली. 1998नंतर प्रथमच जगज्जेता संघ सलग उपांत्य फेरीत धडक मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच फ्रान्सने सातव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. आता त्यांची गाठ प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱया मोरोक्कोशी पडेल.

फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात गोलांसाठी घनघोर कीकयुद्ध होणारच होते आणि तसेच झाले. दोन्ही संघांनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले चढवले. पण पहिला नेम फ्रान्सचा लागला. सामन्याच्या 17व्या मिनिटालाच ग्रिझमनच्या पासवर ऑरेलिया चुआमेनीने कोणतीही चूक केली नाही आणि फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. यानंतरही इंग्लंडकडून बरोबरी आणि फ्रान्सकडून 2-0 आघाडीसाठी जीव तोडून प्रयत्न केले गेले. पण एकाचाही अचूक पास गोल भेदू शकला नाही. हाफटाइमला फ्रान्सची आघाडी 1-0च्या पुढे जाऊ शकली नाही. मात्र हाफटाईमनंतर खेळात आणखी वेग आला. इंग्लंडने पिछाडीनंतर कधीही वर्ल्ड कपमध्ये सामना जिंकला नाही. केवळ सामना बरोबरीत सोडवला आहे. दुसरीकडे फ्रान्सने आघाडीनंतर एकदाही सामना गमावलेला नाही. 26पैकी 25 सामन्यांत फ्रान्स आघाडीनंतर जिंकलाच आहे. केवळ एक सामना बरोबरीत सुटला होता.

ज्याने फ्रान्सला आघाडी मिळवून दिली, त्याच चुआमेनीकडून बॉक्समध्ये बुकायो साकावर फाऊल केले आणि इंग्लंडला रेफ्रीने पेनल्टी बहाल केले. या पेनल्टीचे हॅरी केनने गोल करीत इंग्लंडला बरोबरी साधून दिली. या गोलसह केनने इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणाऱया वेन रुनीची बरोबरी साधली. रुनीने 120 सामन्यांत 53 गोल केले होते तर केनने 80 सामन्यांत त्याची बरोबरी साधली. 1-1 अशा बरोबरीनंतर 78व्या मिनिटाला ग्रिझमनच्या पासवर ऑलिव्हियर जिरूने हेडर मारत फ्रान्सला पुन्हा आघाडी मिळवून दिली. एकाच सामन्यात ग्रिझमनने दोन गोल करण्यासाठी सहकार्य केले. तो असा करणारा टिगाना, रोचेटिआऊ आणि बेंझामानंतर फ्रान्सचा पहिलाच खेळाडू आहे.

हॅरी केनने पेनल्टी गमावली…
1-2ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला 81व्या मिनिटाला हर्नांडेझने फ्रान्सच्या मेसन माऊंटवर फाऊल केल्यामुळे रेफ्रीने इंग्लंडला पुन्हा पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर गोल करण्यासाठी हॅरी केन कीकवर आला, पण त्याची कीक बारच्या वरून गेली. त्यानंतर इंग्लंडकडून गोलचे प्रयत्न झाले, पण एकालाही गोलजाळ्यात स्थान लाभले नाही आणि इंग्लंडचे आव्हान पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीतच संपले.