मेक्सिकोच्या विजयाने चाहत्यांचा जल्लोष; शहराने अनुभवला कृत्रिम भूकंप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेक्सिको

फिफा विश्वचषकामध्ये रविवारी झालेल्या सामन्यामध्ये मेक्सिकोने मागील विजेता संघ जर्मनीचा १-० धुव्वा उडवला. आपल्या संघाने मिळवलेला विजय साजरा करताना मेक्सिकोचे चाहते असे काही नाचले की देशात भूकंप आला. ऐकून जरा दचकला असाल ना? होय… खरच मेक्सिको शहराने काल कृत्रिम भूकंप अनुभवला आहे. भूकंपाची तपासणी करणाऱ्या यंत्रावर याची नोंद करण्यात आली. मेक्सिकोकडून लोझानोने ३५व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. मेक्सिकोच्या संघाने गोल करताच चाहते नाचायला लागले आणि या यंत्रावर हादरे जाणवले.

चाहत्यांनी मेक्सिको शहरातील प्रसिद्ध एंजल ऑफ इंडिपेन्डेंट्स स्मारकाजवळ एकत्र येऊन देशाचा राष्ट्रध्वज फडकावत गाणी गायली.  स्टार फुटबॉलर हिरविंग लोजानोने सामन्याच्या ३५व्या मिनिटाला निर्णायक गोल करताच, चाहते आनंदाने नाचू लागले. ‘आम्ही करून दाखवले’ अशा घोषणा देत नाचू लागले. मेक्सिकोच्या भूवैज्ञानिक आणि वातावरणीय संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी जेव्हा लोजानोने जर्मनीविरुद्ध गोल केला तेव्हा शहरात मोठा हादरा जाणवला.

एंजल ऑफ इंडिपेन्डेंट्सजवळ उपस्थित चाहत्यांनी आनंदाने ‘मेक्सिको, मेक्सिको, मेक्सिको’चा जयघोष करण्यास सुरुवात केली. आमचा संघ आता इतर १५ संघांसह पुढच्या राऊंडमध्ये पोहोचला या भावनेने चाहत्यांचा आत्मविश्वास आणखी द्विगुणित झाला. मेक्सिकोचा संघ आपल्या दमदार खेळीने यशस्वीपणे वाटचाल करत उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम सामन्यातही पोहोचेल, अशी त्यांना अपेक्षा चाहत्यांना आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी गोलकीपर गुलिमेरो ओचाओ याच्या कामगिरीचे प्रचंड कौतुक केले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यामध्ये पराभूत होण्याची १९८२नंतरची जर्मनीची ही पहिलीच वेळ आहे.