पोर्तुगालने ३२ वर्षापूर्वीच्या पराभवाचा वचपा काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

पोर्तुगालने मोरोक्कोवर विजय मिळवत ३२ वर्षापूर्वी १९८६ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या सामन्यात पोर्तुगालने स्टार खेळाडू रोनाल्डोच्या धमाकेदार गोलच्या बळावर मोरोक्कोचा १-० अशा गोल फरकाने पराभव करत अंतिम १६ मध्ये पोहोचण्याची आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. पहिल्या सामन्यात पोर्तुगालने स्पेनविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली होती.

सामन्याच्या सुरुवातीला पोर्तुगालला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर जबरदस्त हेडर लगावत रोनाल्डोने गोल केला. सामन्यातील हा एकमेव गोल आहे. यानंतर मोरोक्कोने सातत्याने पोर्तुगालवर दबाव राखत गोल करण्याचा प्रयत्न केला. अनेक संधी मिळूनही ते गोल करण्यात अपयशी ठरले. मोरोक्कोचा हा सलग दुसरा पराभव आहे.

फुटबॉल विश्वचषकामध्ये फक्त दुसऱ्यांदाच हे दोन्ही संघ आमने-सामने आले. यापूर्वी १९८६ मध्ये झालेल्या सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा ३-१ असा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा पोर्तुगालने काढला आहे. पोर्तुगालचे चार गुण असून त्यांचा पुढचा सामना २५ जूनला इराणसोबत होणार आहे.