बलाढय़ जर्मनीला आज जपानचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार वेळच्या जगज्जेत्या जर्मनीपुढे यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये उद्या, 23 नोव्हेंबरला सलामीलाच जपानचे कडवे आव्हान असेल. 2014 मध्ये जगज्जेते बनलेल्या जर्मनीला 2018 च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गटफेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. याचबरोबर 2020च्या युरो चषकातही या संघाने निराशा केली होती. त्यामुळे यंदाच्या कतारमधील वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी जर्मन खेळाडूंवर दबाव असणार आहे.

स्टार मिडफिल्डर थॉमस मुलर, गोलपोस्टपुढील अभेद्य भिंत मॅनुअल न्यूअर व प्रमुख स्ट्रायकर मारियो गोत्जे या अनुभवी त्रिमूर्तीवर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीची मदार असेल. हे तिन्ही फुटबॉलपटू 2014 मधील जगज्जेत्या संघातील सदस्य आहेत. याचबरोबर चेल्सी क्लबचा काई हावटर्ज, बायर्नचा मिडफिल्डर जोशुआ किमच, मँचेस्टर सिटीचा इके गुडॉन व डॉर्टमंड क्लबचा निकलस सुले या नव्या दमाच्या खेळाडूंकडूनही जर्मनीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जर्मनीने वर्ल्ड कपच्या इतिहासात आठ वेळा फायनल गाठलेली आहे. त्यामुळे मागील वर्ल्ड कपमधील पराभव विसरून हा संघ पुन्हा फिनिक्स भरारी घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल. दुसरीकडे आशिया उपखंडातील एक झुंजार फुटबॉल संघ अशी जपानची ओळख आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये हा संघ सातव्यांदा खेळत आहे. या संघाने या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत तीन वेळा (2002, 2010, 2018) अंतिम 16 मध्ये धडक दिलेली आहे.

आजच्या लढती
मोरोक्को-क्रोएशिया (एफ ग्रुप) : दुपारी 3.30 वाजता
जर्मनी-जपान (ई ग्रुप) : सायं. 6.30 वाजता
स्पेन-कोस्टारिका (ई ग्रुप) : रात्री 9.30 वाजता
बेल्जियम-कॅनडा (एफ ग्रुप) : मध्यरात्री 12.30 वाजता