
फुटबॉलचा महाकुंभ म्हणजेच वर्ल्ड कप 2026 मध्ये होणार असून युनायटेड स्टेट्स (अमेरिका), कॅनडा आणि मेक्सिको असे तीन देश एकत्रित यजमान असणार आहेत. दरम्यान अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळवला जाणार यावर निर्णय होणं बाकी होतं. आता मात्र अंतिम सामन्याचं ठिकाण निश्चित करण्यात आलं असून हा सामना अमेरिकेतील ‘न्यू जर्सी’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था FIFA ने रविवारी जागतिक फुटबल स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रकासह जाहीर केलं आहे.
या स्पर्धेत 48 संघ सहभागी होतील. 19 जुलै रोजी ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर त्याची पूर्णाहूती होणार आहे.
कॅनडा एकूण 13 सामन्यांचं आयोजन करेल, ज्यात टोरंटो आणि व्हँकुव्हर दरम्यान गट स्तरावरील 10 सामन्यांचा समावेश आहे. मेक्सिको सिटी, ग्वाडालजारा आणि मॉन्टेरी येथे गट स्तरावरील 13 सामने खेळवले जातील. उर्वरित सामने युनायटेड स्टेट्समधील 11 शहरांमध्ये होणार आहेत.
टोरंटो, मेक्सिको सिटी आणि लॉस एंजेलिस आपापल्या राष्ट्रीय संघांचे पहिले सामने आयोजित करतील.
2010 मध्ये तयार झालेल्या आणि 82,500 ची क्षमता असलेल्या ओपन-एअर स्टेडियमने 2016 मध्ये कोपा अमेरिका सेंटेनरियो अंतिम सामन्याचं आयोजन केलं होतं जेव्हा चिलीने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केलं होतं.
फिफाने सामन्यांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.
11 जून रोजी मेक्सिको सिटीचे एस्टाडिओ अझ्टेका स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याचे आयोजन करेल. मेक्सिको तिसऱ्यांदा वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करणारं पहिला राष्ट्र बनेल. पहिल्याच दिवशी ग्वाडालजारा येथेही सामना होणार आहे.



























































