फिफा वर्ल्ड कप 2022 पात्रता फेरी – छेत्री ऍण्ड कंपनीसाठी ‘करो या मरो’ची लढत

850

हिंदुस्थानी फुटबॉल संघासाठी उद्या ‘करो या मरो’ अशी लढत असणार आहे. 2022 सालामध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमधील आशियाई फुटबॉल कॉन्फेडेरशन (एएफसी) पात्रता फेरीत हिंदुस्थानला अद्याप आपला ठसा उमटवता आलेला नाही. हिंदुस्थानचा संघ ‘इ’ गटामध्ये चार सामन्यांमधून अवघ्या तीन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हिंदुस्थानला पात्रता फेरीत विजयाचे खातेही उघडता आलेले नाही. अशा परिस्थितीत उद्याच्या लढतीतील पराभव हिंदुस्थानच्या आशांना सुरुंग लावू शकतो. हिंदुस्थान आणि ओमान यांच्यामध्ये उद्या लढत होणार असून याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानचा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

विजयापासून दूरच

हिंदुस्थान-ओमान यांच्यामधील लढतींच्या इतिहासावर नजर टाकल्यास हिंदुस्थान संघ उद्याच्या लढतीआधी ‘अंडरडॉग्स’ असेल हे प्रकर्षाने दिसून येत आहे. कारण दोन देशांमध्ये झालेल्या 11 लढतींपैकी एकाही लढतीत हिंदुस्थानला विजय संपादन करता आलेला नाही. आठ लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तीन लढती ड्रॉ झाल्यात.

दुखापतींचे ग्रहण

हिंदुस्थानला उद्याच्या लढतीत सीनियर खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार आहे. संदेश झिंगन, राओलीन बोर्जेस व अमरजीत सिंग यांनी दुखापतीमुळे माघार घेतली असून सेंट्रल डिफेंडर अनास इडाथोडिका  हाही वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नाही. हिंदुस्थानची मदार आता युवा खेळाडूंवर असणार आहे. अनुभवी सुनील छेत्री युवा खेळाडूंना सोबत घेऊन कशी कामगिरी करतोय हे पाहायला नक्कीच आवडणार आहे.

तर आशियाई कप पात्रता फेरीसाठी संधी

हिंदुस्थानने ओमानला बरोबरीत रोखल्यानंतरही हिंदुस्थानला पुढल्या फेरीत प्रवेश करता येणार नाही. कारण पुढल्या वर्षी होणाऱ्या तीन लढतींमध्ये हिंदुस्थानला मोठी झेप घेता येणार नाही. मात्र 2023 सालामध्ये होणाऱ्या आशियाई कप पात्रता फेरीत प्रवेश करण्यासाठी हिंदुस्थानला ओमानविरुद्ध किमान एक गुण तरी मिळवणे आवश्यक आहे. कारण फिफा वर्ल्ड कपप्रमाणे ही आशियाई कपचीही पात्रता फेरी आहे. हिंदुस्थानने यासाठी जिवाचे रान करायला हवे.

 

गट मधील ताजा गुणतालिका

कतार           – 10 गुण (चार सामने)

ओमान          – 9 गुण (चार सामने)

अफगाणिस्तान    – 4 गुण (चार सामने)

हिंदुस्थान      – 3 गुण (चार सामने)

बांगलादेश     – 1 गुण (चार सामने)

आपली प्रतिक्रिया द्या