टीम इंडियाची आजपासून इंग्लिशची ‘टेस्ट’, दहा महिन्यांनंतर रंगणार मालिकेतील राहिलेली पाचवी कसोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानचा गतवर्षी राहिलेला पाचवा कसोटी क्रिकेट सामना उद्या, शुक्रवार 1 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये सुरू होणार आहे. त्यावेळी चार कसोटी सामने झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पाचवी कसोटी स्थगित करावी लागली होती. त्यामुळे उभय संघांमधील राहिलेला तो कसोटी सामना तब्बल दहा महिन्यांनंतर खेळवला जात आहे. या कसोटीत बाजी मारून मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी असेल. सध्या हिंदुस्थानी संघ मालिकेत 2-1 फरकाने आघाडीवर आहे.

दोन्ही संघांत रंगणार चुरस

इंग्लंडने न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 फरकाने धूळ चारल्याने यजमानांचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिका विजयासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा उद्याच्या कसोटीत खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र इंग्लंडप्रमाणेच हिंदुस्थानकडेही धारदार वेगवान गोलंदाजी ताफा आहे. फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावल्यास हिंदुस्थानला ही कसोटी जिंकून मालिका विजय साजरा करण्याची संधी असेल. मात्र इंग्लंडचा संघ ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविण्यासाठी जिवाचे रान करताना दिसणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना एक तुल्यबळ लढत बघायला मिळेल एवढे नक्की.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील परिणाम

टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धची ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या सत्रात हिंदुस्थानने अंतिम फेरीत धडक दिली होती, मात्र न्यूझीलंडकडून पराभव झाल्याने हिंदुस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱया सत्रात न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे. इंग्लंडकडेदेखील अंतिम फेरी गाठण्याची संधी नाही. मात्र टीम इंडियाला अजून संधी आहे. कारण उर्वरित 7 पैकी 6 कसोटी सामने जिंकल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठता येणार आहे. याचबरोबर 7 पैकी 5 लढती जिंकल्या तरी जर-तरच्या समिकरणावर टीम इंडिया अंतिम फेरी गाठू शकते.

15 वर्षांपूर्वीच्या मालिका विजयाच्या पुनरावृत्तीची संधी

पाचव्या कसोटीत इंग्लंडला पराभूत केल्यास टीम इंडिया तब्बल 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजय साजरा करणार आहे. याआधी 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर 2011, 2014 आणि 2018 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानचा दारुण पराभव झाला होता. बर्मिंगहॅम कसोटीत हिंदुस्थानचा पराभव झाल्यास मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल.

बुमराह करणार टीम इंडियाचे नेतृत्व

कर्णधार रोहित शर्माचा कोरोना चाचणीचा दुसरा अहवालही सकारात्मक आल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. 35 वर्षांत प्रथमच हिंदुस्थानच्या कसोटी संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाजाकडे दिले जाणार आहे. याआधी कपिलदेव हे हिंदुस्थानचे  अखेरचे वेगवान गोलंदाजी करणारे कर्णधार होते. 1987 मध्ये त्यांना कर्णधारपदावरून काढले होते. त्यानंतर आतापर्यंत एकाही वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाचे कर्णधारपद भूषविले नव्हते. हिंदुस्थान 1932 पासून कसोटी क्रिकेट खेळत असून बुमराह हा 36 वा कर्णधार ठरणार आहे.

 ‘रोहित शर्मा सध्या विलगीकरणात असून उपकर्णधार के. एल. राहुलसुद्धा दुखापतीमुळे इंग्लंड दौऱयावर आलेला नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले आहे,’ अशी माहिती हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.