नवरा बायकोचे तुफानी भांडण, बँकॉकला निघालेले दिल्लीला उतरवले

पती पत्नीमध्ये भांडण ङोमं हे काही नवीन नाही. जवळपास सगळ्याच घरांमध्ये नवरा बायकोत भांडणे होतात. यातील काही भांडणे ही लटक्या रागाची असतात तर काही घटस्फोट होईल इथपर्यंत टोकाची असतात. काही भांडणे ही तर जीवघेणी असतात. पुण्यात एका बायकोने दुबईला नेलं नाही म्हणून नवऱ्याच्या नाकावर बुक्का मारला ज्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना नवरा बायकोतील भांडणामुळे बँकॉकला निघालेले विमान नाईलाजाने दिल्लीला उतरवावे लागले.

लुफ्थांसा एअरलाईनने (LH772) निर्धारीत वेळेत जर्मनीतील म्युनिकवरुन बँकॉकच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला होता. पण, प्रवासादरम्यान काही कारणांवरुन जर्मन वंशाचा पती आणि थाई वंशाची पत्नी यांच्यात वादाची ठिणगी पेटली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पत्नीने पती धमकावत असल्याची तक्रार वैमानिकाकडे केली आणि भांडणात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. पण या जोडप्याचा वाद शिगेला पोहोचला आणि यांची तक्रार वैमानिकाने ATC ला केली. या वादामुळे वैमानिकाने सर्वप्रथम विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न केला. पण, त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विनानतळावर या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. दिल्लीमध्ये पोहोचल्यावर जर्मन पतीला विमानातून उतरवण्यात आले. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) अधिकाऱ्याने सांगितले की, विमान कंपनीने जर्मन व्यक्ती संदर्भात जर्मनीच्या उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला आहे. या पतीने सदर प्रकाराबद्दल माफी मागितली असून, त्याचे पुढे काय करायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.