
नेहमीच संघात पुनरागमन करण्यासाठी, स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणारा श्रेयस अय्यर आता एका नव्या सामन्यात उतरला आहे. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया नाही, तर दुखापत आहे!
हो, सिडनीच्या मैदानावर त्याने जरी अॅलेक्स पॅरीचा जबरदस्त डायव्हिंग पॅच घेतला, तरी त्या क्षणाने त्याच्या पोटरीला नव्हे, तर बरगडय़ांना धक्का दिला!
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार श्रेयसच्या डाव्या बरगडीखाली प्लिहेला दुखापत झाली आहे. डाइव्ह मारताना तो असा पडला की, जणू बॉलपेक्षा जमिनीशी त्याचं जास्त नातं जुळलं. परिणामी, त्या कॅचने अर्धा ऑस्ट्रेलिया झटकला, आणि उरलेलं शरीर दुखापतीने. आता अय्यर सिडनीतील आयसीयूमध्ये उपचार घेतोय, पण त्याची मानसिक स्थिती तितकीच दमदार आहे. मेडिकली स्टेबल आणि स्पिरिच्युअली अजेय!
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियातील तज्ञ डॉक्टर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संघाचा डॉक्टर त्याच्यासोबत तिथेच राहणार असल्याचे बीसीसीआयने कळवले आहे. कारण अय्यर हा रुग्ण नव्हे, तर मैदानाबाहेर प्रशिक्षण घेत असलेला योद्धा आहे.
श्रेयसच्या आईवडिलांनी सिडनीकडे रवाना होण्याचा निर्णय घेतलाय; कारण आता घरच्यांच्या नजरेतही ही फक्त ‘दुखापत’ नाही, तर ‘कॉमबॅक मिशन’ आहे. अय्यरने या वर्षी 11 सामन्यांत जवळपास 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दुसऱया वनडेत रोहितसोबत 61 धावांची खेळी म्हणजे जणू त्याच्या बॅटमधून निघालेला ठाम संदेश, स्थान मिळवावं लागतं. मागून नाही, समोरून खेचून घ्यावं लागतं. पण नियतीला कधी कधी जरा नाटय़मय शेवट आवडतो. म्हणूनच साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी ही दुखापत आलीय. आता बॅट नव्हे, तर सहनशक्ती त्याचे मुख्य शस्त्र असेल. आज तो हॉस्पिटलच्या बेडवर आहे, पण चाहत्यांच्या मनात तो अजूनही नॉन-स्ट्रायकर एंडवर तयार आहे. कारण जखम त्याला थांबवू शकते, पण क्रिकेटचा व्हायरस त्याच्या रक्तातून कधीच जाऊ देत नाही.
श्रेयस, हे फक्त तात्पुरतं ‘रिटायर हर्ट’ आहे. तुझं पुढचं पुनरागमनच हिंदुस्थानचा ‘विजय संवाद’ ठरेल, अशी भावना प्रत्येक हिंदुस्थानी चाहता व्यक्त करतोय.



























































