
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील अनेक जुन्या मोडकळीस आलेल्या सेस इमारती व जुन्या चाळींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी आवश्यकता वाटल्यास म्हाडा प्रकल्प ताब्यात घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी विधानसभेत दिले तसेच विकासकांनी भाडे थकवले असल्यास पोलिसांमध्ये तक्रार करण्याची कायद्यात तरतूद करण्यात येईल असे आश्वासन सरकारच्या वतीने यावेळी देण्यात आले.
भायखळा येथील मोहम्मद बक्स बिल्डिंगच्या पुनर्विकासाबाबत अतुल भातखळकर यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेत सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत राज पुरोहित, अमीन पटेल, कालिदास कोळंबकर, अजय चौधरी, सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केले. दादरमधील आर.के. बिल्डिंगचे काम विकासकाने रखडवल्याने रहिवासी रस्त्यावर आले आहेत. या इमारतीचे तातडीने बांधकाम सुरू करण्याची मागणी अजय चौधरी यांनी यावेळी केली. मुंबईत अनेक इमारतींचे बांधकाम रखडले आहे. या रखडलेल्या इमारती म्हाडा ताब्यात घेणार का, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी केला. यावेळी झालेल्या चर्चेला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही उत्तर दिले. ते म्हणाले की, जुन्या इमारतींच्या पुनर्विकास करताना मालक व भाडेकरूमध्ये करार होतो. म्हाडाही यामध्ये सहभागी होऊन त्रिपक्षीय करार करील. अनेकदा विकासक भाडे थकवतात. त्यात भाडेकरूंची फसवणूक होते. विकासकाने भाडे थकवले असले तर पोलिसांमध्ये तक्रार करण्याची तरतूद करण्यात येईल. चर्चेची व्याप्ती वाढल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. जुन्या रखडलेल्या इमारती ताब्यात म्हाडाने घेण्याबाबत सरककट कायदा नाही. अशा रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासावर म्हाडा लक्ष केंद्रित करील. आवश्यकता असेल तर प्रकल्प घेण्याबाबत सरकारमार्फत म्हाडाला सांगण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


























































