सिनेमा खरा असतो…

>> संकलन : निनाद पाटील

मित्रांनो सिनेमा खरा असतो, खऱयाचाच सिनेमा होतो… सांगत आहे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता गणेश पंडित.

सिनेमा खरा असतो की खोटा? माझ्यासाठी सिनेमा खराच असतो. उलट मी म्हणेन खऱयाचाच सिनेमा होतो. तो खरा असतो म्हणूनच आपल्या खऱयाखुऱया आयुष्यावर तो प्रभाव पाडू शकतो. माझ्या प्रत्येक सिनेमाने मला काही ना काही दिलेले आहे, शिकवलेले आहे. सिनेमाच्या पात्रांमध्ये मी माझ्यासाठी नेहमी एक गुरू शोधतोच. याच माझ्या आयुष्यातले सगळय़ात पहिले उदाहरण म्हणजे ‘यल्लो’मधली गौरी आणि तिच्यासारखी इतर स्पेशल मुले.

खऱया अर्थाने निरागसता काय असते हे मी ‘यल्लो’ लिहीत असताना अनुभवले. आम्हाला जगायचे आहे, छान जगायचे आहे, कोणाला त्रास न देता जगायचे आहे आणि मग त्यासाठी आम्हाला मागे टाकून लोक आयुष्यात पुढे गेले तर जाऊ देत…इतकी साधी फिलॉसॉफी घेऊन ती मुले जगतात आणि म्हणून या सततच्या धावपळीने वेगवान बनत चाललेल्या जगात ती स्पेशल म्हणूनच दिसतात. कोणी पुढे गेले म्हणून त्यांना वाईट वाटत नाही आणि कोणी मागे राहिले म्हणून त्यांना त्याचे दुःख होत नाही. स्वतःचा वेग पकडून ती मुले चालत राहतात. ती मुले आपला वेग पकडू शकत नाहीत म्हणून आपण स्वतःला नॉर्मल समजतो. त्या मुलांना त्याचेही काही नसते. कारण ती मुले सुखी असतात, समाधानी असतात. त्यांना गरजेपुरतेच हवे असते. जास्त घेऊन साठवून ठेवण्याची हाव त्यांच्यात नसते. ती मुले भावूक असतात, पण भावनिक गुंतवणूक फार करत नाहीत. कदाचित देवसुद्धा अल्पस्मृतीचे वरदान अशा स्पेशल मुलांना देतो बहुतेक. या आणि अशा बऱयाच गोष्टी मला ‘यल्लो’ लिहीत असताना, करत असताना त्या मुलांनी शिकवल्या. गौरी, संजना आणि त्यांच्याबरोबरची इतर अनेक मुले हे सगळे माझे गुरू होते. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण खऱया अर्थाने जिंकलो मी. त्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, धावण्याचा वेग मंदावला. मी सुखी झालो आणि खऱयाखुऱया अर्थाने स्वतःला स्पेशल वाटायला लागलो.

माझ्यासाठी दुसरा महत्त्वाचा सिनेमा म्हणजे ‘बाळकडू.’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित असलेला हा सिनेमा. त्यांचे राजकीय, सामाजिक विचार कसे होते हे आपण सगळे जाणतो, पण मला मात्र बाळासाहेब ‘माणूस’ म्हणून बरेच काही शिकवून गेले. माझी आणि त्यांची वैयक्तिक भेट कधीही घडलेली नाही. ‘बाळकडू’साठी मी काही लोकांना भेटलो, बाळासाहेबांची भाषणे ऐकली, त्यांच्याबद्दल समजून घेतले आणि मग बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका अचाट पॉझिटिव्ह माणसाची ओळख झाली. हळूहळू त्यांनी मला माझ्या कानात येऊन सांगायला सुरुवात केली की बोल, तुझ्या मनात जे असेल ते बोल. समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोल. समोरच्याच्या भावनांचा आदर ठेवणे म्हणजे आपल्या भावनांचा अनादर करणे नव्हे. समोरच्याला वाईट वाटेल यासाठी आपण स्वतःला आवरतो, ज्याचे आपल्याला वाईट वाटत असते आणि समोरच्याच्या ते गावीसुद्धा नसते. मनात आल्या आल्या गोष्ट बोलून टाकून मोकळे व्हा आणि नाते टिकवायची जबाबदारी समोरच्यावरही टाका. प्रामाणिक स्पष्टवत्तेपणा आणि दुसऱयाला दुखावणारा स्पष्टवत्तेपणा यात फरक आहे. यानंतर माझ्या भिडस्त स्वभावाला हळूहळू का होईना खीळ बसायला सुरुवात झाली. लोकांची मने सांभाळण्याचे टेन्शन आपसूक कमी होत गेले आणि मी जास्त खुलत गेलो. बाळासाहेब या जगातून गेले असले तरी सिनेमाच्या निमित्ताने का होईना आज माझ्यात स्वतःचा एक अंश सोडून गेले.

या दोन सिनेमांचा आणि त्यातल्या खऱयाखुऱया व्यक्तिरेखांचा माझ्या आयुष्यावर सिनेमाच्या निमित्ताने का होईना खूप सकारात्मक परिणाम झालाय, हे मात्र खरे. म्हणून म्हणतो मित्रांनो सिनेमा खरा असतो. खऱयाचाच सिनेमा होतो.