
सामना प्रतिनिधी । मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेला अघोषित संप रात्री उशिरा एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेतला. त्यामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे दिवाकर रावते यांची कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यामध्ये एसटी महामंडळाने कर्मचाऱयांसाठी नुकतीच ४८४९ कोटी रुपयांची ऐतिहासिक वेतनवाढ जाहीर केली आहे. ती करारामध्ये परावर्तित करण्यासाठी एसटी प्रशासन आणि संघटनांची लवकर बैठक घेण्याचा निर्णय झाला.
यावेळी एसटीचे एमडी रणजितसिंह देओल, मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राइब संघटनेचे निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.
दरम्यान आज राज्यात केवळ २० टक्के एवढय़ा कमी एसटीच्या फेऱया झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ठिकठिकाणी प्रवासी अडकून पडल्याचे चित्र होते. एसटी कर्मचाऱयांनी शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या होणारे हाल पाहून प्रशासनाने कर्मचाऱयांचा संप बेकायदेशीर असल्याचे सांगत राज्यभरातील शेकडो कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई केली आहे. एकटय़ा बीड जिह्यात १२१ कर्मचाऱयांना सेवेतून निलंबित केले आहे. तरीही कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी कर्मचाऱयांशी दिवसभर चर्चा केली, मात्र त्यामध्ये तोडगा निघू शकला नाही. त्यामुळेच २५० आगारांतून २० टक्के फेऱया झाल्या असून १५१ आगारांतून तुरळक गाडय़ा सुरू होत्या तर ९७ आगारांमधून एकही फेरी झालेली नाही.
शिवशाही लक्ष्य
संपादरम्यान कर्मचाऱयांनी वातानुकूलित शिवशाही बसला लक्ष्य केले आहे. गेल्या ४८ तासांत राज्याच्या विविध भागांत १९ बस फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान आहे, तर वाहतूक बंद असल्याने एसटीचा आतापर्यंत सुमारे १८ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
डबल डय़ुटीमुळे चालकाचा मृत्यू
डबल डय़ुटी करून घरी परतत असतानाच एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोली येथे घडली. हिंगोली आगारात भास्कर अवचार हे चालक म्हणून कार्यरत होते. आज ते डबल डय़ुटी करून घरी निघाले असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
एसटी महामंडळाने कर्मचाऱयांना ४८४९ कोटी रुपयांची ऐतिहासिक वेतनवाढ नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांच्या वेतनात चांगली वाढ होणार आहे, पण कर्मचाऱयांमध्ये वेतनवाढीसंदर्भात गैरसमज निर्माण झाले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी असे न करता आपली वेतनवाढ नेमकी किती झाली हे समजून घेणे गरजेचे आहे.
– दिवाकर रावते, परिवहनमंत्री.
सध्या घरभाडय़ाचे टप्पे ७-१४-२१ टक्के असे दिले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करताना हे टप्पे ८-१६-२४ केले, तर त्यानुसार एसटीही आपल्या कर्मचाऱयांना लागू करील. तसेच सरकारने सातवा वेतन आयोग देताना ३ टक्के वार्षिक वेतनवाढ दर ठेवल्यास त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढ दिली जाईल.




























































