विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

1) टीडीएस कापू नये म्हणून 15 एच फॉर्म भरून दिलेला असतानाही बँकेने माझ्या पत्नीच्या सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमच्या व्याजातून 20 टक्के दराने टीडीएस कापला आहे. चौकशी केली असता तिचे पॅन आधारशी लिंक केलेले नसल्याने ही करकपात झाली असल्याचे समजले. तिचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेहून खूप कमी आहे. तेव्हा यापुढे टीडीएस लागू नये म्हणून काय करू, तसेच कापलेला टॅक्स परत कसा मिळवता येईल?
– शशिकांत साळवी, बोरिवली, मुंबई

उत्तर : पॅन आणि आधार जोडणी केलेली नसल्याने 15 एच फॉर्म भरून दिलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून 20 टक्के दराने आपल्या पत्नीला मिळणाऱया व्याजातून टीडीएस कापला आहे ते नियमानुसार आहे. आपण पॅन आणि आधार त्वरित लिंक करावा. सध्या यासाठी सध्या रुपये 1000/- दंड आहे. साधारण आठ ते दहा दिवसांत आपल्याला पॅन आधारला लिंक झालेले आयकर विभागाच्या संकेतस्थळावर दिसेल. त्याची लेखी सूचना बँकेस द्यावी म्हणजे यापुढे टीडीएस कापला जाणार नाही. बँकेने कापलेला टॅक्स तिमाही संपल्यावर दीड महिन्यात आयकर विभागाकडे जमा करावा लागतो. त्यापूर्वी असा कापलेला टॅक्स आयकर खात्याकडे जमा करण्याऐवजी तुम्हाला परत करायचा का, याबाबत बँकेचे अधिकारी स्वतंत्र निर्णय घेऊन कदाचित तो परत करू शकतात. परंतु एकदा कापलेला टॅक्स कोणालाही परत करू नये अशा आयकर विभागाच्या सर्वांनाच सूचना आहेत. त्यामुळे आपण त्यांना फक्त कापलेला कर परत करण्याची विनंती करू शकतो. जर त्यांनी कर परत दिलाच नाही तरी आपल्या पत्नीचे एकूण उत्पन्न विहित करपात्र मर्यादेहून खूप कमी असल्याने पुढील वर्षी आपण आयकर विवरणपत्र भरावे, कापून घेण्यात आलेला पूर्ण कर व्याजासह परत मिळेल.

2) डे ट्रेडिंग हा उपजीविकेचा व्यवसाय होऊ शकतो का?
– राहुल पै, ऐरोली, नवी मुंबई

उत्तर : डे ट्रेडिंग हा अलीकडे लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे. अनेक गुंतवणूक तज्ञ दीर्घकालीन गुंतवणूक करावी यावर भर देत असून ते डे ट्रेडिंगला दुय्यम दर्जाचे मानतात. कमी कालावधीत अधिक नफा मिळवावा या उद्देशाने ते केले जाते. ते अधिकृत आहे, त्यामुळे कोणाला मान्य असो नसो आपल्याला ते जमत असेल तर करावे. बाजारात येणारी प्रत्येक व्यक्ती नफा मिळवावा या उद्देशाने येत असते. डे ट्रेडर्स घेत असलेल्या जोखमीमुळे बाजार सातत्याने हलता राहतो. आपण समजतो तेवढे ते सोपे नसावे. अलीकडे सेबीने केलेल्या अभ्यासातून 89 टक्के डे ट्रेडर्स आपले पैसे गमावतात, असा निष्कर्ष समोर आला आहे. तेव्हा डे ट्रेडिंगकडे आपल्या उपजीविकेचे साधन समजणाऱया प्रत्येक व्यक्तीने आपण उरलेल्या 11 टक्के कसे राहू या पद्धतीने व्यवहार करावे. भांडवल न गमावता योग्य प्रमाणात नफा मिळवावा. अतिलोभ धरू नये. आपल्या मानसिकतेला पोषक पद्धती शोधून त्याचे नियम काटेकोरपणे पाळावेत. स्टॉपलॉसचे पालन करावे. सराव करताना आणि प्रत्यक्ष व्यवहार करताना व्यक्तीच्या मानसिकतेत भरपूर फरक पडतो. सरावात कोणताच नफा, नुकसान होत नाही. प्रत्यक्षात एक रुपया कमी-जास्त झाल्यास हजारो रुपयांचा फरक पडतो आणि त्याकडे लक्ष जाऊन चित्त विचलित झाल्याने चुकीचा निर्णय घेतला जाऊन तोटा होऊ शकतो. त्यावर मात करायला जमले तर सातत्याने फायदा मिळू शकतो, असे काही मोठे ट्रेडर्स माझ्या परिचयात असून ते आपली उपजीविका पूर्णपणे यावरच उत्तम प्रकारे करत आहेत.

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.