
डेबिट कार्ड इनव्हॅलिड दाखवत असल्याने त्याची चौकशीसाठी गुगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च करणे तरुणीला चांगलेच महागात पडले. सायबर ठगाने तरुणीच्या खात्यातून 10 लाख रुपये काढले. फसवणूकप्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
चारकोप येथील महिला गेल्या आठवड्यात पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेली असता डेबिट कार्ड इनव्हॅलिड असे दाखवले. यासंदर्भात चौकशीसाठी त्यांनी गुगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधला व त्यावर फोन केला. काही वेळाने मोबाईलवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण खासगी बँकेतून बोलत असल्याच्या भूलथापा मारल्या. भूलथापा मारल्यावर ठगाने तक्रारदारांना डेबिट कार्डबाबत विचारणा केली. डेबिट कार्ड सुरू करायचे असल्यास एनी हेल्प आणि क्विक स्पोर्ट ऍप डाऊनलोड करण्यास सांगतिले. ऍप डाऊनलोड केल्यावर तक्रारदाराच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. जमा झालेल्या पैशाबाबत तक्रारदाराने ठगाला विचारणा केली. ते पैसे दुसऱ्याच्या लोन खात्यातील असून तुमच्या खात्यात जमा झाले आहे. ते पैसे पुन्हा जमा न केल्यास तुम्हाला दंड बसेल अशी त्यांना भीती दाखवण्यात आली. जमा झालेले पैसे विविध खात्यांत जमा करण्यास सांगितले. पैसे जमा होईपर्यंत फोन सुरूच ठेवा, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. याचदरम्यान तक्रारदार यांच्या मॅनेजरचा त्याना फोन आला. तक्रारदार यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्याच्या मॅनेजरला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली.


























































