
सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर थुंकणे, कचरा फेकणे, राडारोडा रस्त्यावर टापून मुंबईत अस्वच्छता पसरणाऱयांवर आता धडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यासाठी क्लीन-अप मार्शल नाही तर 350 ज्युनियर सुपरवायझरची नियुक्ती केली जाणार असून अस्वच्छता पसरवणाऱयांवर नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500, राडारोडा रस्त्यावर फेकल्यास 25 हजारांपर्यत दंड आकारण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांवर नजर ठेवून कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लीन-अप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र मुंबईकर आणि क्लीन-अप मार्शल यांच्यात होणारे वाद आणि क्लीन-अप मार्शलवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे क्लीन-अप मार्शलना पालिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता ज्युनियर सुपरवायझरची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी 350 उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
न्यूसेंस डिटेक्टरसाठीही प्रयत्न
अस्वच्छता पसरवणाऱयांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे 102 न्यूसेंस डिटेक्टरची 102 पदे आहेत. या पदांबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबत संबंधित कामगार युनियनशीही पालिकेची बोलणी सुरू आहे. त्यामुळे हे न्यूसेंस डिटेक्टरही लवकरच सेवेत येतील.


























































